‘सूर विश्वास’च्या पहिल्या पर्वास दमदार प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 17:30 IST2019-02-07T17:29:39+5:302019-02-07T17:30:02+5:30
शोध कलावंतांचा : नाकील यांच्या अप्रतिम स्वरांची सजली मैफल

‘सूर विश्वास’च्या पहिल्या पर्वास दमदार प्रारंभ
नाशिक : नाशिकमधील कलावंतांचा शोध घेऊन त्यांच्यातील कलाविष्काराला दाद देण्यासाठी विश्वास ग्रुपच्यावतीने आयोजित ‘सूर विश्वास’ या उपक्रमाच्या पहिल्या पर्वास दमदार सुरुवात झाली. पहिले पुष्प उदयोन्मुख गायक प्रीतम नाकील यांनी गुंफले. विनामूल्य आयोजित या मैफलीचा रसिकांनी आनंदानुभव घेतला.
आयोजक विश्वास ग्रुपचे कुटुंबप्रमुख विश्वास ठाकूर आणि ग्रंथमित्र विनायक रानडे यांच्या संकल्पनेतून ‘सूर विश्वास’ हा उपक्रम राबविला जाणार आहे. या उपक्रमांतर्गत शहरातील कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करुन दिले जाणार असून विनामूल्य होणाऱ्या या उपक्रमाला रसिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. पहिल्याच मैफलीत उदयोन्मुख गायक प्रीतम नाकील यांनी आपल्या दमदार सादरीकरणाने रंग भरला. मैफलीची सुरूवात ‘मियाँ की तोडी मध्ये विलंबित ख्यालाने झाली. त्यानंतर त्यांनी राग तिलक कामोद सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले संत तुकारामांच्या अभंगातून त्यांनी भाव-भक्ती रसाने स्वराभिषेक केला. ‘हेचि माझे तप’ व ‘लक्ष्मी वल्लभा’ या अभंगातून भक्ती रंगात सारे न्हाऊन निघाले.कुमार गंधर्वांच्या गायकीची आठवण यानिमित्ताने नाशिककरांनी अनुभवली. शून्य गढ शहर व गुरूजी मै तो या भजनांनी मनाच्या निर्गुणतेचा वेध घेतला.‘अवधूता गगन घटा’ या भैरवीने मैफलीची सांगता केली. साथसंगत ईश्वरी दसककर (हार्मोनियम), दिगंबर सोनवणे (तबला), मृत्युंजय वाघ (तानपुरा),हिमांशू कुलकर्णी (तानपुरा) यांनी केली.
या वेळी ‘ग्रंथ तुमच्या दारी’चे शिल्पकार विनायक रानडे यांचा कवी सी.एल. कुलकर्णी यांच्या हस्ते रसत्कार करण्यात आला. सूत्रसंचलन डॉ. स्मिता मालपुरे यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. मनोज शिंपी यांनी केले.
संगीताबरोबरच न्याहरीचा स्वाद
विश्वास गार्डन येथे आयोजित या मैफलीला नाशिककरांनी मोठी गर्दी केली होती. संगीताच्या मेजवानीबरोबरच उपस्थित रसिकांसाठी विनामूल्य न्याहरीचीही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. त्यामुळे, रसिकांनी सूरांच्या साथीने मिसळवरही ताव मारला.