पहिले हजार ५८ दिवसांत; दुसरे अवघ्या २० दिवसांतच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 00:22 IST2020-06-15T23:06:13+5:302020-06-16T00:22:14+5:30
नाशिक : नाशिक जिल्ह्यामध्ये मार्च, एप्रिल आणि मेअखेरपर्यंत धिमा असलेला कोरोनाबाधितांचा वेग चौथा लॉकडाऊन संपण्याच्या सुमारास प्रचंड वेगाने फोफावू लागला आहे. २९ मार्चला नाशिकमध्ये पहिला कोरोनाबाधित झाल्यापासून १००० बाधितांचा आकडा गाठायला २५ मे अर्थात तब्बल ५८ दिवस लागले होते.

पहिले हजार ५८ दिवसांत; दुसरे अवघ्या २० दिवसांतच !
नाशिक : (धनंजय रिसोडकर) नाशिक जिल्ह्यामध्ये मार्च, एप्रिल आणि मेअखेरपर्यंत धिमा असलेला कोरोनाबाधितांचा वेग चौथा लॉकडाऊन संपण्याच्या सुमारास प्रचंड वेगाने फोफावू लागला आहे. २९ मार्चला नाशिकमध्ये पहिला कोरोनाबाधित झाल्यापासून १००० बाधितांचा आकडा गाठायला २५ मे अर्थात तब्बल ५८ दिवस लागले होते. मात्र, त्यानंतर अवघ्या २० दिवसांत म्हणजेच १५ जूनलाच नाशिकने २००० बाधितांचा आकडा ओलांडला असून, हा वेग जवळपास तिप्पट असल्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेसह आरोग्य सचिव स्तरापर्यंतची यंत्रणादेखील हादरून गेली आहे.
नाशिक जिल्ह्यात प्रारंभी नागरिकांनी प्रचंड कसोशीने लॉकडाऊन पाळल्याने मार्चअखेरपर्यंत बाधित सापडला नव्हता. २९ मार्चला अखेर नाशिकला पहिला कोरोनाबाधित सापडला. मात्र, त्यानंतर पहिला शंभरीचा टप्पा गाठायला २१ एप्रिल म्हणजे २३ दिवस लागले होते. म्हणजे प्रारंभीचा १०० टप्पा आणि या महिन्यातील दुसरा १००० टप्पा गाठायला त्यापेक्षाही तीन दिवस कमी अशी परिस्थिती आहे.
----------------------
पाचशेच्या टप्प्यांचा वेगदेखील भयावह
जिल्ह्याने पहिला पाचशेचा टप्पा गाठण्यास ५ मे अर्थात प्रारंभापासून ४० दिवस लागले होते. त्यानंतरचा दुसरा ५००चा टप्पा म्हणजे १००० रुग्णांपर्यंत पोहोचण्यास अवघा २० दिवसांचा (२५ मे) कालावधी लागला होता. एकप्रकारे बरोबर निम्म्या कालावधीत पुढील ५०० रुग्णांचा टप्पा गाठला गेला,
-----------------------
जुने नाशिक केंद्रस्थानी
मे महिन्याच्या उत्तरार्धापासून मालेगाव आणि परिसरातील कोरोनाबाधितांचा आकडा कमी होत असताना शहरातील आणि त्यातही जुने नाशिक तसेच वडाळागाव परिसरातील बाधितांच्या आकड्यात मोठी भर पडली. त्यामुळे बाधितांचा केंद्रबिंदू मालेगाववरून जुने नाशिक आणि वडाळाकडे सरकला असल्याचे दिसून येत आहे.
----------------------
वेग दसपटीने :
बाधितांच्या प्रसाराची तुलना प्रारंभीच्या १००च्या टप्प्याशी करायची झाल्यास हा वेग दसपटीने अधिक आहे,
हेदेखील वास्तव
आहे.