जलयुक्त शिवार अभियानाचा पहिल्याच टप्प्यात फज्जा
By Admin | Updated: August 29, 2015 00:20 IST2015-08-29T00:20:35+5:302015-08-29T00:20:35+5:30
मूर्तिजापूर तालुक्यातील ६ गावांतील कामांसाठी निधीच मिळाला नाही!

जलयुक्त शिवार अभियानाचा पहिल्याच टप्प्यात फज्जा
मूर्तिजापूर (जि. अकोला) : जलयुक्त शिवार अभियानातील कामांसाठी निवडण्यात येणार्या गावांकरिता निधी उपलब्ध करून देण्यासाठी अनेक योजना असतानाही मूर्तिजापूर तालुक्यातील सहा गावांतील कामांकरिता निधीच उपलब्ध न झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे ह्यसर्वांसाठी पाणी-टंचाईमुक्त महाराष्ट्र २0१९ह्णच्या उद्देशाला हरताळ फासण्याचेच काम करण्यात आल्याची चर्चा आहे. राज्यात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. यावर्षी भूजल पातळीत २ मीटरपेक्षा जास्त घट झालेले १८८ तालुके आहेत. तर २२ जिल्हय़ांमधील १९ हजार ५९ गावांत टंचाईची परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. भविष्यात पाणीटंचाई निर्माण होऊ नये म्हणून राज्यात ह्यजलयुक्त शिवार अभियानह्ण राबविण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. जलयुक्त शिवार अभियानात शेततळे, नालाबांध, ढाळीचे बांध, पाणलोट विकासाची कामे, नाला खोलीकरण, सरळीकरण, पिण्याच्या पाण्याचे स्रोत बळकटीकरण अशी अनेक कामे करता येतात. या कामांसाठी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, राज्यस्तर निधी, आदिवासी उपाययोजना, विशेष घटक योजना, मुख्यमंत्री सहायता निधी, खासदार, आमदार यांचा निधी यासह अनेक योजनांचा निधी वापरण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. असे असतानाही मूर्तिजापूर तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत निवडण्यात येणार्या २३ गावांपैकी ६ गावांतील कामांसाठी निधीच प्राप्त झाला नाही. त्यामुळे या गावात कामांचा श्रीगणेशा होऊ शकला नाही.