नाशिकच्या गंजमाळमध्ये एकाच रांगेतील दहा घरांना आग
By दिनेश पाठक | Updated: November 21, 2025 11:50 IST2025-11-21T11:50:16+5:302025-11-21T11:50:39+5:30
Nashik Fire News: नाशिक शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शालिमार नजीक गंजमाळ येथे शुक्रवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागली. झोपडपट्टीत एकाच रांगेतील दहा घरांसह दोन दुकाने आगीत भस्मसात झाली.

नाशिकच्या गंजमाळमध्ये एकाच रांगेतील दहा घरांना आग
नाशिक - शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शालिमार नजीक गंजमाळ येथे शुक्रवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागली. झोपडपट्टीत एकाच रांगेतील दहा घरांसह दोन दुकाने आगीत भस्मसात झाली. सकाळच्या सुमारास या भागातील अनेक लोक नियमित कामकाजासाठी झोपेतून उठले होते, त्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली, परंतु काही झोपेत असलेल्या लोकांना व लहान मुलांना ताबडतोब घराच्या बाहेर काढण्यात यश आले. या दहा घरामधून भरलेले सिलिंडर तसेच लहान बालकांना तातडीने घराबाहेर काढल्याने अनर्थ टळला. मुलांना शाळेत पाठवण्याची तयारी सुरू असतानाच आग लागल्याचे निदर्शनास आले.
दहा घरांच्या मध्यभागी एक भंगारचे दुकान असल्याने आगीची झळ वाढली. अग्निशामक दलाच्या तीन ते चार बंबांनी आग चाळीस मिनिटात आटोक्यात आणली. परंतु या आगीमध्ये स्थानिक नागरिकांच्या घरातील महत्त्वाचे कागदपत्र, पैसे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, पलंग, गादी व इतर साहित्य जळून खाक झाले आहे. लाखो रुपयांचे नुकसान झाले असून महानगरपालिका तसेच पोलिस पथकाने तातडीने घटनास्थळी भेट दिली. स्थानिक नागरिकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. गंजमाळमध्ये यापूर्वी देखील आगीच्या घटना घडलेल्या आहेत.