नाशिकमध्ये सिडकोत घरात उडाला आगीचा भडका; रहिवासी बाजारात गेलेले असल्याने अनर्थ टळला
By अझहर शेख | Updated: December 2, 2023 14:49 IST2023-12-02T14:48:45+5:302023-12-02T14:49:01+5:30
अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने पाण्याचा होज घरापर्यंत नेऊन जोरदार दाबाने पाण्याचा मारा केला.

नाशिकमध्ये सिडकोत घरात उडाला आगीचा भडका; रहिवासी बाजारात गेलेले असल्याने अनर्थ टळला
नाशिक : भाजीपाला खरेदीसाठी रहिवासी बाजारात गेलेले असताना त्यांच्या बंद घरात अचानकपणे आगीचा भडका उडाला. सिडकोमधील तोरणानगर भागात शनिवारी (दि.२) दुपारी बारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी पोहोचेपर्यंत घरातील संसारोपयोगी साहित्य जळून राख झाले होते.
तोरणानगर भागात उर्दू हायस्कूल आहे. यामागे अमृतकर यांच्या घरात भाडेकरू म्हणून योगेश खैरनार हे आई, पत्नी व मुलांसह राहतात. शनिवारी राहत्या घरातील व्यक्ती घराबाहेर गेलेल्या असताना अचानकपणे आगीचा भडका उडाला. सुदैवाने यावेळी घरात कोणी नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. आगीने क्षणार्धातच रौद्रावतार धारण केला होता. घटनेची माहिती मिळताच सिडकोतील लेखानगर येथे असलेले अग्निशमन दलाच्या उपकेंद्रावरून बंबासह जवान घटनास्थळी दाखल झाले. अरुंद गल्लीबोळ व दाट लोकवस्ती यामुळे आग विझविण्याच्या आपत्कालीन कार्यात अडथळा निर्माण झाला होता.
अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने पाण्याचा होज घरापर्यंत नेऊन जोरदार दाबाने पाण्याचा मारा केला. यामुळे अवघ्या वीस मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळविता आले. अन्यथा आग पसरण्याचा मोठा धोका होता. या दुर्घटनेत घरातील टीव्ही, फर्निचर, कपाट, गादी आदी साहित्य जळून भस्मसात झाले. आग नेमकी कशी लागली याचे कारण समजू शकलेले नाही. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात अकस्मात नोंद करण्यात आली आहे.