नाशिकमध्ये पुन्हा अग्नितांडव; फर्निचर मॉल जळून खाक, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
By अझहर शेख | Updated: November 3, 2022 10:41 IST2022-11-03T10:41:19+5:302022-11-03T10:41:44+5:30
अग्निशमन दलाच्या जवानांनी दहा बंबाच्या साह्याने दोन तास शर्थीचे प्रयत्न करत आग नियंत्रणात आणली.

नाशिकमध्ये पुन्हा अग्नितांडव; फर्निचर मॉल जळून खाक, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
नाशिक : नाशिक शहराला लागून असलेल्या वडनेर-पाथर्डी रस्त्यावरील एका फर्निचर मॉलसह त्याशेजारी असलेल्या भंगार मालाच्या गोदामाला गुरुवारी पहाटे पावणे चार वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. यावेळी मॉलमध्ये झोपलेले आठ ते दहा कामगार सुदैवाने वेळीच जागे झाले आणि बाहेर पळाले. यामुळे मोठी जीवितहानी टळली. या आगीमध्ये लाखोंचे नुकसान झाले आहे. मॉलजवळ उभी असलेली तीन ते चार वाहने जळून राख झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी दहा बंबाच्या साह्याने दोन तास शर्थीचे प्रयत्न करत आग नियंत्रणात आणली.
वडनेर रोडवरील राजपूत कॉलनी येथे गुरुवारी (दि. 3) पहाटेच्या सुमारास प्लास्टिक व भंगार मालाच्या गोदामाला भीषण आग लागली. आगीमुळे परिसरात धुराचे लोटव ज्वाला पसरल्या. शेजारी असलेले फर्निचर चे मोठे दुकान देखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. शहरातील अग्निशमन दल मुख्यालय शिंगाडा तलाव येथील दोन बंब, सिडको, सातपूर, नाशिकरोड, विभागीय केंद्र कोणार्क नगरबया ठिकाणाहून प्रत्येकी दोन तसेच अंबड एमआयडीसी केंद्राचा एक अशा दहा बंबाच्या साह्याने जवानांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
पावणे चार वाजता अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळाली. यानंतर एकापाठोपाठ एक बंब घटनास्थळी पोहचले. फर्निचरमुळे लाकडी साहित्य, स्पंज, कुशन, भंगारमालातील प्लॅस्टिकचा माल मोठ्या प्रमाणात पेटला. यामुळे आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले. आग इतकी भीषण होती की आजूबाजूला असलेल्या काही घरापर्यंत पोहचली. रहिवाशी जागे झाल्याने अनर्थ टळला. ही आग शॉर्टसर्किटमुळे किंवा कोणी तरी शेकोटी पेटविल्याने लागली असावी, असा अंदाज वर्तविला जात आहे.
या ठिकाणी अनधिकृत भंगार व्यवसायिकांनी कित्येक दिवसांपासून बस्तान मांडले असून स्थानिक लोकांचा त्यास विरोध आहे. भंगार मार्केट हटवावे अशी परिसरातील नागरिकांनी मागणी केली आहे.