येवला : तालुक्यातील हडप सावरगाव येथील तलाठी अतुल शंकरराव थूल याच्या विरुद्ध तालुका पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
तालुक्यातील हडप सावरगाव येथील शेत गट नं. ५७/3 या शेत जमीन बोगस मृत्युपत्राद्वारे आपल्या स्वतःच्या पत्नी अरुणा जगन्नाथ गाजरे यांच्या नावे लावल्याबाबत मूळ मालकाच्या वारस मंदा पवार यांनी तहसीलदार प्रमोद हिले यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. हिले यांनी याबाबत मंडळ अधिकारी अशोक भिकाजी गायके यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याची सूचना केली होती.
सदर अहवालात तलाठी थूल दोषी आढळल्याने तालुका पोलिसात मंडळ अधिकारी गायके यांनी थूलविरुद्ध फिर्याद दाखल केली. तालुका पोलिसांनी थूल यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक भिसे करत आहेत.
तलाठी थूल यांनी तालुक्यातील ८ एकर जमीन मृत्युपत्रावरून पत्नी अरुणा जगन्नाथ गाजरे यांच्या नावे केली होती. दरम्यान, मूळ मालकाच्या वारस मंदा पवार वारस नोंदीसाठी गावी आल्यानंतर सदर प्रकार उघडकीस आला होता. याबरोबरच तलाठी थूल याने स्वतःच्या पत्नी व नातेवाइकांच्या नावे अनेकांचे शासकीय अनुदान लाटल्याच्या तक्रारीही प्राप्त झाल्याने याप्रकरणी स्वतंत्र चौकशी सुरू असल्याचे तहसीलदार हिले यांनी सांगितले.