सफाई कामगारांच्या भरतीसाठी पंधरा हजार रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 19:03 IST2020-06-12T18:58:43+5:302020-06-12T19:03:20+5:30
नाशिक : शहरात सुमारे सातशे सफाई कामगार आउटसोर्सिंगने भरण्यासाठी ठेकेदार वॉटर ग्रेस कंपनीकडून सध्या कामगारांची भरती सुरू आहे. तथापि, ...

सफाई कामगारांच्या भरतीसाठी पंधरा हजार रुपये
नाशिक : शहरात सुमारे सातशे सफाई कामगार आउटसोर्सिंगने भरण्यासाठी ठेकेदार वॉटर ग्रेस कंपनीकडून सध्या कामगारांची भरती सुरू आहे. तथापि, त्यासाठी ठेकेदार कंपनीने उमेदवारांकडून पंधरा हजार रुपये वसूल केले जात असल्याच्या आरोपामुळे पुन्हा वाद निर्माण झाला आहेत. अशाप्रकारे नियमबाह्य पद्धतीने वसुली सुरू असून, ठेकेदाराची चौकशी करावी, अशी मागणी नगरसेवक आणि अन्य पक्षांनी केली आहे. मात्र, संबंधित ठेकेदार कंपनीने ही वैधमार्गाने घेतली जाणारी रक्कम असून, ती साहित्य सुविधा म्हणून वापरली जाणार आहे. शिवाय ती अनामत रक्कम असल्याने काम सोडणाऱ्या कामगाराला परत केली जाणार आहे, असे स्पष्टीकरण दिले आहे शहरात सफाई कामगारांची संख्या अल्प असल्याने साफसफाईसाठी महापालिकेने तीन वर्षांसाठी आउटसोर्सिगंचे ठेका दिला आहे. या ठेकेदाराकडे आत्तापर्यंत साडेतीन हजार उमेदवारांची नावे शिफारस म्हणून आली आहेत. आत्तापर्यंत पाचशे कामगारांची भरती ठेकेदाराने पूर्ण केली आहे. मात्र, त्यातून वाद सुरू झाले आहेत. ठेकेदार प्रति उमेदवार १५ हजार रुपये आकारत असल्याची तक्रार असून, महापौर सतीश कुलकर्णी, उपमहापौर भिकूबाई बागुल, माजी सभागृह नेते दिनकर पाटील, म्युनिसीपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष प्रवीण तिदमे यांनी केली आहे.
दरम्यान, सदरची रक्कम ही अनामत रक्कम म्हणून आहे. त्यातही कंपनीमार्फत दोन गणवेश, हँडग्लोज, गम बुट आणि कचरा उचलण्यासाठी व्हील बरोज व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जीपीएस यंत्रणा यासाठी हा खर्च आहेच, परंतु कोणी कामगार आठ-दहा-पंधरा दिवसांत सोडल्यास सुरक्षितता म्हणून ही अनामत रक्कम घेतली जात आहे, असे वॉटरग्रेसचे संचालक चेतन बोरा यांनी कळवले आहे. संबंधित कामगारांनी काम सोडल्यास त्यांना पूर्ववत ती रक्कम परत दिली जाणार असल्याचेदेखीलही बोरा यांनी सांगितले.