दुबार पेरणीच्या संकटाची भीती
By Admin | Updated: July 22, 2016 22:27 IST2016-07-22T22:24:36+5:302016-07-22T22:27:58+5:30
चिंता : पावसाची वक्र दृष्टी

दुबार पेरणीच्या संकटाची भीती
येवला : तालुक्यातील खरिपाच्या शंभर टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असल्या तरी मुळात बहुतांशी भागात पर्जन्यमान कमीच आहे. अल्पपावसाच्या ओलीत पेरण्या आटोपल्या असल्या तरीही पावसाने विश्रांती घेतल्याने यंदा खरीप हंगाम वाया जाण्याची भीती निर्माण झाली असून, दुबार पेरणीचे संकटही उभे राहू नये म्हणून बळीराजाने पुन्हा महादेवाला साकडे घातले आहे.
सूर्यदर्शन होत नसून सर्वत्र केवळ ढगाळ वातावरण आहे; परंतु पावसाचा पत्ताच नाही. त्यामुळे शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवाय उतरून पडलेले मका, बाजरी, मूग, पीक आता पिवळे पडत आहे. शिवाय मका या पिकावर खोडकिडीचा प्रादुर्भाव झाला असल्याने शेतकऱ्याची चिंता अधिकच वाढली आहे. पीकविमा घेण्याची तयारी अनेक शेतकऱ्यांनी बोलून दाखवली.
गेल्या तीन वर्षांपासून सततच्या दुष्काळाने पिचलेल्या शेतकऱ्याला यंदा ऐन हंगामात पुन्हा वरुणराजाने वक्रदृष्टी केल्याने चिंता वाढली आहे. यावर्षी हवामान खात्याच्या अंदाजानुसार शेतकरी चांगल्या पर्जनवृष्टीची अपेक्षा बाळगून होते. मात्र मृग नक्षत्र पूर्णत: कोरडे गेले आणि आर्द्रा नक्षत्रातील जेमतेम पावसावर काही भागात ५० टक्के खरीप पेरण्यांची कामे आटोपली होती. त्यानंतर पाऊस बेपत्ता झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. पुनर्वसू नक्षत्रानेही शेतकऱ्यांची निराशा केल्यानंतर गेल्या आठवड्यात सलग तीन दिवस भीज पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या. पाऊस थांबताच शेतकऱ्यांनी कपाशी, मका, बाजरी, भुईमूग व कडधान्य पिकांच्या पेरण्यांना गती दिली. त्यामुळे १०० टक्के क्षेत्रावर पेरण्यांची कामे आटोपली. मात्र, आठवड्यापासून फक्त ढगाळ वातावरण असून, पाऊस बेपत्ता झाला आहे. आता पाण्याअभावी पिके संकटात सापडली आहेत. तालुक्यातील उत्तर-पूर्व भागात सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाला; पण सध्या पावसाने पाठ फिरवली आहे तर पश्चिम भागात अद्यापही दमदार पर्जन्यवृष्टी झालेली नसल्याने विहिरींना पाणी उतरणे तर दूरच जमिनीची तहानदेखील भागलेली नाही. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात मोठ्या पावसाची आतुरतेने प्रतीक्षा केली जात आहे. यंदा चांगला पाऊस होईल या अंदाजावर पुन्हा कर्ज काढून उभारी धरलेल्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चारा छावण्या तर येवला तालुक्याला मृगजळच ठरल्या.
भीज पावसाने निर्माण झालेल्या हिरवळीवर सध्या जनावरे पोसली जात आहेत. (वार्ताहर)