The father of industrial settlement: Suryabhan Gadakh | औद्योगिक वसाहतीचे जनक : सूर्यभान गडाख

औद्योगिक वसाहतीचे जनक : सूर्यभान गडाख

शैलेश कर्पे।
सिन्नरचे माजी आमदार, औद्योगिक वसाहतीचे जनक सूर्यभान गडाख यांचे दहा दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा.....
११ जानेवारी १९३० मध्ये निफाड तालुक्यातील उंबरखेड येथे जन्म झालेल्या सूर्यभान गडाख वयाच्या १६ व्या वर्षी सातवी उत्तीर्ण झाले. वर्गात हुशार व तेवढाच चंचल, निर्भीड व स्वछंदी वृत्तीचे असलेल्या एकत्रित कुटुंबात असल्यामुळे शेतीकामात कष्ट करावे लागत होते. त्यातच १९४७ मध्ये आई-वडिलांचा मृत्यू झाला. कुटुंबात मायेच्या पदराखाली घेवून गुपचूप भाकरी खावू घालणारी आई सोडून गेल्याने खूप दु:ख झाले. आई-वडिलांचे छत्र हरपल्याने त्यांचे मन सैरावैर झाले. आपत्ती मागून आपत्ती सुरु झाल्या. शिक्षणाची इच्छा असूनही पुढे शिक्षण घेऊ शकले नाही.
स्वाभिमानी, निर्भिड वृत्तीतून ते घराबाहेर पडले ते काहीतरी करण्याच्या जिद्दीतूनच. १९४९-५० च्या दरम्यान क्रांतीसिंह नानासाहेब पाटील, शाहीर अमर शेख यांच्यासारख्या ग्रामीण भागात जागृती करणाऱ्या महान व्यक्तींचा सहवास त्यांना लाभला. त्यातून त्यांच्या जीवनाला नवी दिशा मिळाली. पुढे देवपूर गावातूनच त्यांच्या चळवळींना सुरुवात झाली.
जमिन एकत्रिकरण कायदा सुधारण्यासाठी दिलेल्या शांततापूर्ण लढा, ५४-५५ च्या दुष्काळात निवारणासाठी प्रयत्न, १९५६ मध्ये संयुक्त महाराष्टÑाचा लढा, महाबळेश्वर येथे जनआंदोलनात सहभाग, पुन्हा तुरुंगवास त्यानंतर सिन्नर पूर्व मतदार संघातून लोकल बोर्डावर १९५७ मध्ये निवड झाली. अशा प्रकारे सार्वजनिक जीवनातून नानांचा राजकीय जीवनात प्रवेश झाला.
राजकीय पाठबळ मिळाल्यानंतर लोकांचे प्रश्न सोडविण्याला अधिक वेग आला. शेतीच्या पाण्याचे प्रश्न, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न, रस्त्यांचा प्रश्न, नोकऱ्यांचा प्रश्न अशा अनेक संकटांना सामोरे गेले. त्यांचे तालुक्याच्या प्रत्येक गावाचे शिवार अन् शिवार तोंडपाठ झाले. त्यातूनच पंचायत समिती उपसभापती, सभापती, आमदार अशी कारकीर्द चढत्या क्रमांकाने उंचावत गेली. लोकांचे प्रश्न सोडवत असतांना दुष्काळाचा प्रश्न हा सातत्याने सोबत होता. त्यातूनच १९७२ चा प्रचंड मोर्चा व गोळीबार, तुरुंगवास, मीटर हटाव आंदोलन, भोजापूर धरणाचा सत्याग्रह अशा ऐतिहासिक लढ्यांचे नेतृत्त्व त्यांनी केले.
दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून तालुक्यात २०० च्या वर पाझर तलावांची निर्मिती करतांना राज्याला पाझर तलावांची ओळखच सिन्नरमधून करुन दिली. बोरखिंडचा लघुपाटबंधारे प्रकल्प, शेतीसाठी विजेचा पुरवठा, वडांगळीची सरस्वती जलसिंचन उपसा योजना, पाथरेची श्रीराम जलसिंचन योजना, बारागावपिंप्रीची गोदावरी उपसा योजना, शहा येथील भैरवनाथ उपसा प्रकल्प आदि प्रकल्प उभे करण्यासाठी परिश्रम घेतले.
रस्ते, पाणी, वीज, रोजगार हे प्रश्न सोडवितांनाच शिक्षणाची निकड लक्षात घेऊन तालुक्याच्या ग्रामीण भागात चांगले शिक्षण मिळावे म्हणून १९६४ साली माध्यमिक लोकशिक्षण मंडळाची स्थापना केली. जनी ज्ञानदीप लावू हे ब्रिद घेवून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध करुन दिली. पुढे औद्योगिक वसाहतीतील कामगार व औद्योजकांच्या मागणीनुसार आधुनिक इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु केली. प्रतिकूल परिस्थितीत संकटांवर मात करीत संघर्षमय प्रवासातून तालुक्याच्या विकासासाठी नानांनी प्रामाणिक प्रयत्न केले. त्याचेच फळ म्हणून आज सिन्नरची विकासाकडे घोडदौड सुरु आहे.

Web Title:  The father of industrial settlement: Suryabhan Gadakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.