टमाटाच्या क्रेट चोऱ्यांनी शेतकरी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 16:21 IST2020-12-18T16:21:32+5:302020-12-18T16:21:49+5:30
दिंडोरी तालुका : शेतकरी घरांना लावणार सीसीटीव्ही

टमाटाच्या क्रेट चोऱ्यांनी शेतकरी त्रस्त
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील गेल्या पाच ते सहा दिवसांपासून ओझे, म्हैळुस्के, लखमापूर, उमराळे खुर्द येथील शेतकऱ्यांचे टमाट्याचे रिकामे क्रेट घराजवळून रात्रीच्या वेळेस चोरी होण्याचे प्रमाण वाढल्यामुळमुळे शेतकरीवर्ग त्रस्त झाला आहे. या चोऱ्यांसंदर्भात ओझे येथील सुनील ढाकणे यांनी दिंडोरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद नोंदवली आहे.
म्हैळुस्के येथील सुरेश कुलकर्णी, उमराळे खुर्द येथील गुलाब हिरे , पाडे येथील सुभाष नाठे, लखमापूर येथील सतीश सोनवणे यांचेही टमाट्याचे क्रेट चोरी झाले आहेत. त्याप्रमाणे लखमापूर येथील मंगेश शिदे यांच्या पिकअप गाडीची स्टेपणी चोरीस गेली आहे. अनेक शेतकरी मार्केटमधून माल विकून आल्यानंतर रिकामे क्रेट आपल्या गाडीत किंवा घराजवळ कुठे तरी शेडमध्ये सुरक्षित ठिकाणी ठेवत असतात. रात्रीच्या वेळेस घराबाहेर कुणीही नसल्याचा संधीचा फायदा घेऊन या चोरट्यांनी शेतकऱ्यांचे रिकामे क्रेट चोरण्याचा सपाटा लावला आहे. तालुक्यात आतापर्यंत अशा क्रेट चोरीच्या किरकोळ घटना घडत आल्या आहेत; परंतु एकाच वेळेस दीडशे ते दोनशे क्रेट घराजवळून चोरी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. बाजारमध्ये एका क्रेटची किंमत अंदाजे २३० ते २५० रुपये एवढी आहे.