येवला बाजार समितीतील अनागोंदीने शेतकरी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 18:16 IST2021-02-08T18:16:16+5:302021-02-08T18:16:47+5:30
नगरसूल : येवला कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकीय अधिकारी कारकीर्द असून मार्केटच्या दैनंदिन कामकाजावर कोणाचेच नियंत्रण नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.

येवला बाजार समितीतील अनागोंदीने शेतकरी त्रस्त
नगरसूल : येवला कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकीय अधिकारी कारकीर्द असून मार्केटच्या दैनंदिन कामकाजावर कोणाचेच नियंत्रण नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.
व्यापारी अर्जावरून मार्केट दिवसेंदिवस बंद ठेवणे, मार्केट बंदचा फलक मार्केट बंदच्या दिवशी लावणे त्यामुळे शेतकऱ्यांना विनाकारण मन:स्ताप सहन करीत परत जावे लागत आहे. विकलेल्या मालाचे पैसे २४ तासांत व्यापारी अदा करणार असा गवगवा मार्केट कमिटीने केला; पण प्रत्यक्षात काही व्यापाऱ्यांकडून ८/१५ दिवसांच्या अंतराने पैसे दिले जातात.
या प्रकाराची दखल घेतली जात नसल्यामुळे माल विकूनदेखील शेतकऱ्यांना पैसे मिळत नाही. शेतकरी शेतमाल बाजारात आणण्यासाठी रात्री-अपरात्री ट्रॅक्टर भरून आणतात. तो माल मार्केटमध्ये विकतात, मात्र व्यापारी त्यांना त्यांच्या सोयीने पैसे देतात अशावेळी शेतकऱ्यांनी काय करावे, असा प्रश्न नगरसूल येथील प्रगतिशील शेतकरी प्रभाकर निकम यांनी निवेदनाद्वारे उपस्थित केला आहे.
संबंधित प्रशाकीय अधिकाऱ्यांनी याकडे तत्काळ लक्ष घालून शेतकऱ्यांना २४ तासात पैसे अदा होतील याची व्यवस्था करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.