द्राक्षबागांना जिवाणू करप्याचा धोका, शेतकऱ्यांसमोर शेती व्यवस्थापनाची कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 19:01 IST2018-06-24T18:56:33+5:302018-06-24T19:01:01+5:30
राज्यात येणार येणार म्हणून लांबलेल्या मान्सूनच्या आगमनाचे अखेर संकेत दिसू लागले असून, सर्वत्र ढगाळ वातावरण व गेल्या एक-दोन आठवड्यांत झालेल्या अनियमित पावसामुळेही तपमानात चढ उतार होऊ वातावरणातील जलदगतीने बदलामुळे शेती पिकांवर रोगांच्या प्रादुर्भावाची शक्यता असल्याने बळीराजाची शेती व्यवस्थापन करताना कसरत होत आहे.

द्राक्षबागांना जिवाणू करप्याचा धोका, शेतकऱ्यांसमोर शेती व्यवस्थापनाची कसरत
नाशिक : राज्यात येणार येणार म्हणून लांबलेल्या मान्सूनच्या आगमनाचे अखेर संकेत दिसू लागले असून, सर्वत्र ढगाळ वातावरण व गेल्या एक-दोन आठवड्यांत झालेल्या अनियमित पावसामुळेही तपमानात चढ उतार होऊ वातावरणातील जलदगतीने बदलामुळे शेती पिकांवर रोगांच्या प्रादुर्भावाची शक्यता असल्याने बळीराजाची शेती व्यवस्थापन करताना कसरत होत आहे. ढगाळ वातावरणामुळे द्राक्षबागांवर जिवाणू करप्याचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी या काळात खास काळजी घेण्याची गरज असल्याचा सल्ला कृषितज्ज्ञांनी दिला आहे. तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर पावसापासून कांदा वाचविण्याचे संकट उभे असतानाच वादळी पाऊस आणि गारपिटीपासून फळभाज्या व पालेभाज्या वाचविण्यासाठीही शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे.
जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीत कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाल्याने शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागले असताना जूनच्या उत्तरार्धात ढगाळ हवामान आणि वादळी वाऱ्यामुळे द्राक्षबागांवर जिवाणू करप्याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. मान्सून आगमनाच्या काळात होणाऱ्या गारपिटीमुळे पाने फाटणे, हिरव्या काडीवर जखमा होण्याचे प्रकार घडू शकतात. त्यामुळे जिवाणू करपा किंवा मोट्रीओडिप्लोडिया यांसारख्या बुरशा काडीमध्ये वाढण्याची शक्यता असते. द्राक्ष उत्पादक शेतकयांसमोर अशाप्रकारे करपा नियंत्रणाचे आव्हान असताना कांदा उत्पादक व फळभाज्या, पालेभाज्या उत्पादन शेतकरीही संकटात आहे. मान्सूनचा पाऊस तोंडावर आलेला असताना भाव वाढण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा साठविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. त्याचप्रमाणे मान्सूनच्या आगमनाबरोबरच शेतकऱ्यांची खरिपाच्या पेरणीसाठी लगबग सुरू होणार आहे. मात्र पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी किमान ८० ते ९० मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच शेतकºयांनी पेरणी करण्याचा सल्ला कृषितज्ज्ञांनी दिला आहे.
वातावरणातील वाढत्या आर्द्रतेमुळे द्राक्षबागेतील फुटीवरील बगलफुटीची वाढ जास्त प्रमाणात होताना दिसून येईल. अशा परिस्थितीत कॅनॉपीची गर्दी वाढेल व जुनी होत असलेल्या कॅनॉपीमध्ये भुरी रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येईल. याकरिता बागेत बगलफुटी वेळीच काढाव्यात व त्याचबरोबर तळातील २-३ पाने काढून टाकावीत. यामुळे फुटींची गर्दी टाळता येईल व रोगांचा प्रादुर्भाव कमी होईल.
- रावसाहेब पाटील, कृषी विज्ञान केंद्र प्रमुख, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ
कांदा साठविण्याच्या कामाला वेग
उन्हाळ कांद्याला संपूर्ण हंगामात केवळ ३०० ते ६०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. शेवटच्या टप्प्यात हे दर काही प्रमाणात वधारले असले तरी उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळेच १ जूनपासूनच्या संपकाळात शेतकºयांनी कांदा बाजारपेठेत आणणे थांबविले असून, कांद्याचे नुकसान टाळण्यासाठी कांदा साठविण्याच्या कामाला वेग आला आहे. परंतु पुरेशी आणि तंत्रशुद्ध यंत्रणा नसल्याने घरात, गोठ्यात जशी जागा उपलब्ध होईल तसा कांदा साठविण्याची नामुष्की शेतकºयांवर आली आहे.
पावसाच्या अंदाजानुसार पीकपद्धती ठरवा
भारतीय हवामानशास्त्र दरवर्षी एप्रिल महिन्यात लांबपल्ल्याचा हवामान अंदाज वर्तवते. त्यानुसार ज्या भागात सरासरीपेक्षा पाऊस कमी होण्याचा अंदाज आहे त्या भागात कमी पाण्यावर येणाºया पिकांची निवड करावी. त्यात भुईमूग, सोयाबीन, घेवडा, मूग, मटकी, उडीद, धने तसेच कमी कालावधीचं तुरीचं वाण, बाजरी, ज्वारी, सूर्यफूल, मिरची इत्यादी पिकांच्या निवडीस प्राधान्य देण्याचा सल्ला कृषितज्ज्ञांनी दिला आहे.