मालेगाव : तालुक्यात पडलेल्या दुष्काळामुळे वाया गेलेला खरीप हंगाम, बँकेकडून घेतलेल्या सात लाख रुपये कर्जाची परतफेड कशी करायची या विवंचनेत तालुक्यातील साकुरी नि. येथील रवींद्र शिवाजी धोंडगे (३०) या तरुण शेतकºयाने विषप्राशन करून आत्महत्या केली आहे. तहसीलदार ज्योती देवरे यांनी सोमवारी गृहभेट दिली असून, येथील तहसील कार्यालयात शेतकरी आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे. गेल्या शुक्रवारी रवींद्र याने विषप्राशन केले होते. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. रवींद्र यांच्या नावावर ०.४६ गुंठे क्षेत्र आहे. यंदा दुष्काळ पडल्याने शेतीतून उत्पन्न आले नाही. तसेच बँकेने कर्ज वसुलीसाठी तगादा लावत नोटीस बजावली होती. कर्जाची परतफेड कशी करायची या विवंचनेतून आलेल्या नैराश्येतून रवींद्र यांनी आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, तीन मुले असा परिवार आहे. सोमवारी तहसीलदार देवरे यांनी धोंडगे कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. तहसील कार्यालयात शेतकरी आत्महत्येची नोंद घेण्यात आली आहे. तसा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला जाणार आहे.
मालेगाव तालुक्यात कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 01:32 IST