वीजेचा धक्का लागून शेतकरी पिता- पुत्राचा मृत्यू; परिसरात पसरली शोककळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2023 20:37 IST2023-03-14T20:36:58+5:302023-03-14T20:37:04+5:30
आदल्या दिवशी झालेल्या पावसाने शॉर्टसर्किट होऊन तारेतील विद्युत प्रवाह वीज मोटरीमध्ये उतरलेला होता.

वीजेचा धक्का लागून शेतकरी पिता- पुत्राचा मृत्यू; परिसरात पसरली शोककळा
- अमृत कळमकर
खडकी (ता. मालेगाव, जि. नाशिक) : शेतातील विहिरीवर पाणी घेण्यासाठी गेलेल्या तरुण शेतकऱ्यासह त्याच्या वडिलांचाही वीजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना येथे घडली आहे. पिता- पुत्राच्या या अपघाती मृत्यूमुळे परिसरामध्ये शोककळा पसरली आहे.
सध्या कांदे काढणीचा हंगाम सुरू आहे. खडकी येथील समाधान पंढरीनाथ कळमकर (३०) हा तरुण शेतकरी कांदे काढण्यासाठी सकाळी ८ वाजताच कुटुंबासह शेतात गेला होता. तेथे असलेल्या मजुरांसाठी पाणी आणण्यासाठी तो विहिरीवर गेला.
आदल्या दिवशी झालेल्या पावसाने शॉर्टसर्किट होऊन तारेतील विद्युत प्रवाह वीज मोटरीमध्ये उतरलेला होता. ही बाब लक्षात न आल्याने समाधान याने वीजेची मोटार सुरू करताच त्याला वीजेचा जोरदार झटका बसला. यावेळी त्याने मदतीसाठी हाक दिल्याने शेजारीच असलेल्या वडिलांनी मुलाला वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी हातानेच मुलाला बाजूला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनाही वीजेचा जोरदार धक्का लागला. यामुळे समाधान तसेच पंढरीनाथ पांडुरंग कळमकर या दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
या दोघांचे मृतदेह मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. तेथे शवविच्छेदन करण्यात आले. मृत पंढरीनाथ यांच्या पश्चात पत्नी आहे. तसेच समाधान यांच्या पश्चात पत्नी, मुलगी व मुलगा असा परिवार आहे. या परिसरामध्ये अनेक ठिकाणी वीजवाहक तारा खांबांवर लोंबकळत असून त्याकडे वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष होत असल्याची परिसरातील शेतकऱ्यांची तक्रार आहे. शासनाने कळमकर कुटुंबास आर्थिक मदत देण्याची मागणीही परिसरातून करण्यात येत आहे.