कांदा दरात घसरण बळीराजा हवालदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 17:43 IST2020-07-10T17:43:11+5:302020-07-10T17:43:26+5:30
कवडदरा : कोरोनाचा परिणाम शेतमालावरही दिसत आहे. सध्या कांद्याची मागणी घटली असून, साठवलेला कांदा सडत असल्याने आवक वाढली आहे.

कांदा दरात घसरण बळीराजा हवालदिल
कवडदरा : कोरोनाचा परिणाम शेतमालावरही दिसत आहे. सध्या कांद्याची मागणी घटली असून, साठवलेला कांदा सडत असल्याने आवक वाढली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून हॉटेल व्यवसाय ठप्प होता. त्यामुळे कांद्याच्या मागणीत मोठी घट झाली. घरगुती वापरासाठी लागणारा कांदा विक्री सुरू असली, तरी दरात अद्याप समाधानकारक सुधारणा झालेली नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
दरवर्षी प्रमाणे यंदाही शेतकरी कांद्याच्या दरात वाढ होण्याची वाट पाहत आहेत. परंतु, यंदा कमी कालावधीत कांदा सडू लागल्याने शेतकऱ्यांचाही नाईलाज झाला आहे. कमी दरात कांद्याची विक्री करण्याची वेळ आली आहे. कांद्याला चांगला दर मिळेल, या आशेवर शेतकऱ्यांनी चाळीत कांदा साठवून ठेवला. चाळीतील कांदाही सडू लागला आहे. त्यामुळे मिळेल त्या भावात शेतकरी विक्री करीत आहेत. सहाशे ते आठशे रुपये क्विंटल दरातून कांदा उत्पादनाचा खर्चही सुटत नसल्याचे कांदा उत्पादक रवी निसरड यांनी सांगितले. साठवण करूनही तोटाच होत आहे. उन्हाळी कांदा काढला, त्यावेळी एक ते दीड हजार रुपये क्विंटल दर होता. त्यानंतर लॉकडाउन सुरू झाले. लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर कांद्याच्या दरात सुधारणा होण्याची शक्यता होती. परंतु, सध्या सहाशे ते आठशे रुपये दर मिळत आहेत. तसेच चाळीत साठवलेला कांदा यंदा तीस टक्के सडला आहे. त्यामुळे कांद्याची साठवण करुन फायदा झाला नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करतात.