अंदरसूल परिसरात घरांची पडझड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 15:59 IST2021-05-30T15:59:14+5:302021-05-30T15:59:52+5:30
अंदरसूल : परिसरात शनिवारी (दि.२९) दुपारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे परिसरातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून घरांची पडझड झाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले.

अंदरसूल परिसरात वादळी पावसामुळे उघड्यावर पडलेले संसार.
अंदरसूल : परिसरात शनिवारी (दि.२९) दुपारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे परिसरातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून घरांची पडझड झाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले.
दुपारी ४ वाजेच्या सुमारास व रात्री ९ वाजेपासून वादळीवारा तसेच छोट्या गारांसह वादळी पावसाने हजेरी लावली. अचानक वादळ व पाऊस आल्यामुळे वाड्यावस्त्यांवर शेतकऱ्यांची धावपळ झाली. जयहिंदवाडी परिसर व उंदीरवाडी रस्त्यांवरील वस्त्यांवर घरांची पत्रे उडाली, तर काही घरे कोसळली. त्यामुळे शेतकऱ्यांचा संसार उघड्यावर पडला.
अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. त्यामुळे विजेचे खांब पडल्याने रात्रभर वीजपुरवठा खंडित झाला होता. एकनाथ जानराव, बाबुराव हाडोळे, किरण एंडाईत या शेतकऱ्यांची घरे व कांदाचाळीचे पत्रे उडाले. अंदरसूल गाव व परिसरातील पूर्वेकडील भागात वादळी पावसाने हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याची मागणी होत आहे.