चलनात आढळल्या पाचशेच्या बनाटवट नोटा, नाशकात रॅकेटची चर्चा
By नामदेव भोर | Updated: April 14, 2023 16:30 IST2023-04-14T16:30:12+5:302023-04-14T16:30:40+5:30
नाशिकच्या बाजारात चलनामध्ये बनावट नोटा आणण्यासाठी मोठे रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

चलनात आढळल्या पाचशेच्या बनाटवट नोटा, नाशकात रॅकेटची चर्चा
नाशिक : नाशिक शहरातील कोटक महिंद्रा बँकेच्या थत्तेनगर कॉलेजरोड शाखेत एक ग्राहक भरणा करण्यासाठी आलेला असताना त्याने रोखपालाकडे दिलेल्या पाचशेच्या नोटांमध्ये पाचशे रुपये किंमतीच्या ७ नोटा या बनावट असल्याची घटना समोर आली. या घटनेमुळे नाशिकच्या बाजारात चलनामध्ये बनावट नोटा आणण्यासाठी मोठे रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्यामाहिती नुसार, बँकेच्या कर्मचारी संगिता नितीन चिनावले यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात पाचशेच्या बनावट नोटा आढळल्याविषयी तक्रार दिली असून या प्रकरणात पोलिसांनी अज्ञात व्यक्तीने या नोटा चलनात आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
संगिता चिनावले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कॉलेजरोड भागातील कोटक महिंद्र बँकेच्या शाखेत रमेश शाह हे भरणा करण्यासाठी आले होते. मात्र त्यांनी आणलेल्या पैशांमध्ये पाचशे रुपये किंमतीच्या सात नोटा बनावट असल्याचे रोखपालाच्या निदर्शनास आले. त्यामुळे बँकेच्या कर्मचारी संगिता चिनावले यांनी गंगापूर पोलिस ठाण्यात घडलेला प्रकार कथन करून तक्रार नोंदवली असून पोलिसांनी याप्रकरणात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणात सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र बैसाने अधिक तपास करीत आहेत.