फेसबुक, ट्विटरला पर्याय हॅशफोन
By Admin | Updated: January 23, 2016 22:35 IST2016-01-23T22:34:43+5:302016-01-23T22:35:33+5:30
मालेगाव : सहा तरुणांनी साकारली वेबसाइट

फेसबुक, ट्विटरला पर्याय हॅशफोन
मालेगाव : येथील सहा तरुणांनी हॅशफोन वेबसाइटची निर्मिती केली असून, ही वेबसाइट फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटर, यू ट्यूब व इन्स्टाग्राम यांना पर्याय ठरू शकेल, असा दावा या तरुणांनी केला आहे. या वेबसाइटवर फोटो, व्हिडीओ व टेक्ससाठी स्वतंत्र जागा दिली आहे.
हॅशटॅगच्या साहाय्याने एकाच क्लिकवर त्यांचा वापर करता येईल. ही सोपी व सरळ प्रणाली सोशल मीडियात क्रांती करणारी ठरेल, असे पराग चोरडिया यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पराग काहीतरी आगळेवेगळे करण्याच्या ध्येयाने झपाटला. त्याने अश्पाक अहमद, शाहरीक मोमीन, अब्दुल रहेमान, तौसिफ अंजुम, केशव पवार यांच्या मदतीने ही वेबसाइट तयार केली. यासाठी दीड महिना परिश्रम घेतले. २४ तासात या वेबसाइटला एक हजाराहून लाइक्स मिळाले तर ११४ रजिस्टर यूजर्स झाले. सुटसुटीत व वापरण्यासाठी सोपी पद्धती यात विकसित करण्यात आली आहे. प्रत्येक घटनेचे स्वतंत्र पोर्टल यात करता येईल. यामुळे इंटरनेटचा खर्च वाचवण्याबरोबरच सोशल यूजर्सचा वेळ वाचणार आहे. फेक पोस्टच्या संख्येला आळा बसेल असे मत त्यांनी व्यक्त केले. सदर उपक्रमाचे स्वागत होत आहे. (वार्ताहर)