नेत्रदान : नाशिक अग्निशामक दलाचे बंबचालक पोटिंदे यांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 16:21 IST2018-06-24T16:20:54+5:302018-06-24T16:21:47+5:30

नेत्रदान : नाशिक अग्निशामक दलाचे बंबचालक पोटिंदे यांचा मृत्यू
नाशिक : शिंगाडा तलाव येथील अग्निशामक मुख्यालयात बंबचालक म्हणून कार्यरत असलेले जगन्नाथ राजाराम पोटिंदे (५२) हे शुक्रवारी (दि.२२) दिवसपाळीवर नियमितपणे मुख्यालय येथे हजर होते. संध्याकाळी सहा वाजता अचानकपणे पोटिंदे यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने ते दुरध्वनी कक्षात कोसळले. यावेळी उपस्थित जवानांनी तत्काळ त्यांना आपत्ती व्यवस्थापन आणिबाणी अंतर्गत सेवा देणाऱ्या जीपमधून जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. वैद्यकिय उपचार सुरू असताना तासाभरानंतर पोटिंदे यांची प्राणज्योत मालवली. डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. पोटिंदे हे म्हसरुळ गावातील रहिवासी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुली, भाऊ असा परिवार आहे. पोटिंदे हे अत्यंत कष्टाळू होते. मागील २८ वर्षांपासून अग्निशामक दलात बंबचालक म्हणून सेवा बजावत होते. शांत स्वभाव असलेले पोटिंदे हे बंबचालक म्हणून अत्यंत प्रामाणिकपणे कार्यरत होते. वेळेप्रसंगी पोटिंदे यांनी घटनास्थळी आणिबाणी परिस्थीती बघता अनेकदा फायरमन म्हणून दलाला मदतकार्यही केले असल्याची माहिती सब स्टेशन अधिकारी दिपक गायकवाड यांनी सांगितले. अचानकपणे पोटिंदे यांचा दुर्देवी मृत्यू झाल्याने अग्निशामक दलावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे. पोटिंदे यांच्या इच्छेनुसार त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचे मरणोत्तर नेत्रदान केले.