जेलरोडमार्गेअवजड वाहनांची सर्रास वाहतूक ; वाहतूक शाखेचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 00:28 IST2017-11-24T23:06:59+5:302017-11-25T00:28:18+5:30
जेलरोडमार्गे अवजड वाहनांना वाहतुकीस बंदी असताना वाहतूक शाखेच्या दुर्लक्षामुळे सर्रासपणे अवजड वाहनांची वाहतूक बिनबोभाट सुरू आहे. यामुळे वाहतुकीची कोंडी होत असून, शुक्रवारी सायंकाळी झालेल्या अपघातात एक वृद्धाचा मृत्यू झाला आहे.

जेलरोडमार्गेअवजड वाहनांची सर्रास वाहतूक ; वाहतूक शाखेचे दुर्लक्ष
नाशिकरोड : जेलरोडमार्गे अवजड वाहनांना वाहतुकीस बंदी असताना वाहतूक शाखेच्या दुर्लक्षामुळे सर्रासपणे अवजड वाहनांची वाहतूक बिनबोभाट सुरू आहे. यामुळे वाहतुकीची कोंडी होत असून, शुक्रवारी सायंकाळी झालेल्या अपघातात एक वृद्धाचा मृत्यू झाला आहे. जेलरोडवर अनेक शाळा तसेच सरकारी मुद्रणालय असल्याने सकाळपासून सायंकाळपर्यंत विद्यार्थी व कामगारांची मोठी वर्दळ असते. तसेच जेलरोड मार्ग हा औरंगाबाद व पुणे महामार्गाला जोडला गेला असल्याने बाहेरगावच्या वाहनांची येथे सारखी ये-जा असते. यापूर्वीही येथे अनेक अपघात झाल्याने जेलरोड मार्गावरून जड वाहनांना वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. इंगळेनगर, जेलटाकी व सैलानीबाबा दर्गा चौकात वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी सिग्नल बसविण्याची मागणी यापूर्वीच अनेक राजकीय पक्षांनी केली आहे. मात्र सदर मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही. जेलरोड परिसरात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वसली असून, त्या रहिवाशांची परिसरात सतत रेलचेल असते. जेलरोडमार्गे जड वाहनांना वाहतुकीस बंदी असताना वाहतूक शाखेचे दुर्लक्ष होत असल्यामुळे सर्रासपणे दिवस-रात्र जड वाहनांची वाहतूक सुरू असते. यामुळे वाहतुकीची कोंडी होत असून, सतत अपघात होण्यासारखी स्थिती असते. बिटको चौक, नांदूरनाका येथे वाहतूक शाखेने जेलरोडला जेथून सुरुवात होते तेथे ‘जड वाहतुकीस बंदी’ असा फलक लावणे गरजेचे आहे.
वाहतूक पोलिसांची आवश्यकता
जेलरोडवर असलेली शाळा-महाविद्यालये, मुद्रणालय ते दुपारी एकाचवेळी सुटतात व भरतात. सायंकाळीदेखील हीच स्थिती असते. यावेळी विद्यार्थी, कामगार यांची मोठी गर्दी असते. त्यामुळे यावेळेला वाहतूक सुरळीत राहण्यासाठी बिटको ते जेलटाकीपर्यंत वाहतूक पोलिसांची नेमणूक होणे व तेथे रस्त्यावर भरणारा भाजीबाजार हटविणे गरजेचे आहे.