नाशिक : महाराष्ट्र राज्य उच्चशिक्षण संचालनालयातर्फे शिक्षणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी बी.एड. सीईटी परीक्षा अर्ज भरण्यास १ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, तर एम.एड च्या सीईटी परीक्षेसाठी मंगळवार (दि.२५) मेपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून, या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांना १५ मेपर्यंत सीईटी परीक्षेचा अर्ज भरता येणार आहे. बी.एड. अभ्यासक्रमासाठी सामाईक परीक्षा देणे अनिवार्य असते. त्यामुळे २०१७ - १८ या शैक्षणिक वर्षात बीएडला प्रवेश घेणाऱ्यांसाठी सीईटी परीक्षेला प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना ५ ते २५ एप्रिल या कालावधीत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली होती. परंतु अनेक जण या परीक्षेसाठी अर्ज करू न शकल्याने परीक्षा आयोजकांनी सीईटीसाठी अर्ज करण्याची मुदत १ मेपर्यंत वाढवून दिली आहे. ही सीईटी परीक्षा १३ व १४ मे रोजी नाशिक शहरातील विविध परीक्षा केंद्रांवरून घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांना ४ मेपासून सीईटी परीक्षा प्रवेशासाठी ओळखपत्राची प्रत डाउनलोड करता येणार आहे. शहरातील शिक्षणशास्त्र महाविद्यालयांकडून बी.एड. व एम.एड. सीईटी परीक्षेचे मोफत प्रवेश अर्ज भरून दिले जात आहेत.
बीएड, सीईटीचा अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
By admin | Updated: April 26, 2017 01:52 IST