एक्सप्रेशन-२०१७ : ...जेव्हा नाशिकचे डॉक्टर दाखवितात रॅम्पवर आपला जलवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 16:14 IST2017-12-18T16:09:36+5:302017-12-18T16:14:58+5:30
‘ताणतणावमुक्त डॉक्टरर्स’ संकल्पनेवर आधारित इंडियन मेडिक ल असोसिएशनच्या वतीने आयोजित ‘एक्सप्रेशन-२०१७’ या सांस्कृतिक महोत्सवाचे.

एक्सप्रेशन-२०१७ : ...जेव्हा नाशिकचे डॉक्टर दाखवितात रॅम्पवर आपला जलवा
नाशिक : वैद्यकीय सेवा देणा-या डॉक्टरांनी मॉडेलप्रमाणे प्रथमच रॅम्पवर ‘एन्ट्री’ करत कॅटवॉक सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले. यावेळी डॉ. मीनल रणदिवे यांनी ‘आयएमए क्वीन’ होण्याचा बहुमान पटकाविला तर डॉ. शर्मिला कुलकर्णी यांनी हायनेस स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला.
निमित्त होते, ‘ताणतणावमुक्त डॉक्टरर्स’ संकल्पनेवर आधारित इंडियन मेडिक ल असोसिएशनच्या वतीने आयोजित ‘एक्सप्रेशन-२०१७’ या सांस्कृतिक महोत्सवाचे. विश्वास लॉन्समध्ये रंगलेल्या या रंगारंग सोहळ्यात डॉक्टरांमधील कलागुणांचे दर्शन प्रेक्षकांना घडले. व्यावसायिक मॉडेललाही लाजवेल, अशा अदा डॉक्टरांनी सादर करत रॅम्पवर कॅटवॉक करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. वैद्यकीय सेवेचे कार्य बजावताना सातत्याने आपत्कालीन परिस्थितीमध्ये डॉक्टरांना कौशल्य पणाला लावावे लागते, या कामातून येणारा तणाव दूर करण्यासाठी आयएमएच्या महिला मंडळाच्या वतीने या महोत्सवाची संकल्पना मांडली. या सोहळ्यात ‘आयएमए क्वीन’ व ‘हायनेस’ या दोन स्पर्धा घेण्यात आल्या. प्रारंभी महिला डॉक्टरांनी रॅम्पवर कलागुणांचे सादरीकरण करत ‘फॅशन-शो’चा जलवा दाखविला. यावेळी डॉक्टरांनी नृत्य व गायनाचा कार्यक्रम सादर केला. त्यांना साथसंगत एम.एच१५ रॉक बॅण्डच्या वादकांनी केली. यावेळी झालेल्या फायर-शो ने कार्यक्रमाची रंगत वाढविली. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सीमा हिरे, महापालिका आयुक्त डॉ. अभिषेक कृष्ण, मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार उपस्थित होते. परीक्षक म्हणून फॅशन स्टायलिश तृप्ती बाफना, डॉ. मनोज चोपडा यांनी काम पाहिले. आयएमएचे अध्यक्ष डॉ. मंगेश थेटे यांनी प्रास्ताविक केले तर सचिव डॉ. हेमंत सोनणीस, उपसचिव डॉ. किरण शिंदे आदींनी पाहुण्यांचे स्वागत केले. सूत्रसंचालन रोहन मेहता यांनी केले.
३२ डॉक्टरांचा स्पर्धेत सहभाग
आयएमए क्वीन स्पर्धेत २४ व हायनेस गटात ८ अशा एकूण ३२ डॉक्टरांनी सहभाग घेतला होता. यावेळी रणदिवे यांना आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते मुकुट देऊन गौरव करण्यात आला. तसेच कुलकर्णी यांना मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी गौरविले. क्वीन स्पर्धेत डॉ. वैशाली अग्रवाल यांनी द्वितीय तर डॉ. वृषाली राजाध्यक्ष यांनी तृतीय क्र मांक मिळविला आणि हायनेस गटात डॉ. विजयलक्ष्मी गणोरकर यांनी द्वितीय तर डॉ. सुनीता देशमुख यांनी तृतीय क्रमांक राखला.