गुन्हेगारांवर जरब बसण्याची अपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 00:37 IST2018-07-28T00:37:10+5:302018-07-28T00:37:25+5:30
बारा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीवर बलात्काराच्या प्रकरणात मृत्युदंडासह दोषींना कठोर शिक्षा देण्याचा प्रस्ताव असणारे फौजदारी कायदा विधेयक लोकसभेत सादर करण्यात आले. ते लवकरच संमत होण्याची शक्यता आहे. यावरून या विषयाचे गांभीर्य आता शासन पातळीवर घेतले जात असल्याचे दिसते. हा निर्णय चांगला असून, त्याचे कठोरपणे पालन केले जावे. विकृतींना जरब बसावा अशी अपेक्षा वकील, सामाजिक कार्यकर्ते, मानसोपचारतज्ज्ञ यांनी व्यक्त केली आहे.

गुन्हेगारांवर जरब बसण्याची अपेक्षा
नाशिक : बारा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीवर बलात्काराच्या प्रकरणात मृत्युदंडासह दोषींना कठोर शिक्षा देण्याचा प्रस्ताव असणारे फौजदारी कायदा विधेयक लोकसभेत सादर करण्यात आले. ते लवकरच संमत होण्याची शक्यता आहे. यावरून या विषयाचे गांभीर्य आता शासन पातळीवर घेतले जात असल्याचे दिसते. हा निर्णय चांगला असून, त्याचे कठोरपणे पालन केले जावे. विकृतींना जरब बसावा अशी अपेक्षा वकील, सामाजिक कार्यकर्ते, मानसोपचारतज्ज्ञ यांनी व्यक्त केली आहे. याबाबत विविध प्रतिनिधींशी साधलेला हा संवाद.
हा अत्यंत चांगला निर्णय आहे. कायद्याचा धाक असल्याशिवाय हे विकृत लोक सुधारणार नाहीत. या गोष्टीला आळा बसलाच पाहिजे. असे प्रकार होऊ नये यासाठी वेळोवेळी प्रबोधनही केले जाते, पण अशा घटना कमी होण्याऐवजी वाढतच चालल्या आहेत. त्यामुळे आता कायद्याची भीती तरी लोकांना वाईट कृत्यांपासून थांबवेल. - डॉ. हेमलता पाटील, नगरसेवक
धोरणात्मक बाब म्हणून हा निर्णय योग्य आहे. पण आजच्या युगाला तो साजेसा नाही. कारण एकाला फाशी झाली म्हणून दहा जण घाबरतील, असा जमाना आता राहिलेला नाही. आजच्या निर्ढावलेल्या विकृत मानसिकतेला वेगळ्या शिक्षेची गरज आहे. लोकांची मानसिकता बदलत चालली आहे. तिला जरब बसेल, असे कठोर कायदे आता झाले पाहिजे. - अमोल कुलकर्णी, मानसोपचारतज्ज्ञ
फाशीची शिक्षा हा प्रकारच हास्यास्पद वाटतो. अशा प्रकारच्या गंभीर घटनांनंतर गुन्हेगार आणि त्याला फाशीची शिक्षा सुनावणारे हे दोघेही सारखेच गुन्हेगार वाटतात. कारण फाशीची अंमलबाजवणी काही लवकर होत नाही. घटनेचे गांभीर्य राहत नाही. त्यापेक्षा महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे नोंदविले जातील याचा आग्रह धरला पाहिजे. या घटनेमुळे बाईच्या चारित्र्याला डाग लागला, काचेचे भांडे फुटले असे अतिरंजित वातावरण तयार करणे थांबविले पाहिजे. - अनिता पगारे, सामाजिक कार्यकर्त्या