नाशिक : झाडे लावा, झाडे जगवा..., पर्यावरणाचे संरक्षण काळाची गरज..., जंगले जगली तर पृथ्वी जगेल, अशा विविध घोषणांच्या माध्यमातून पर्यावरण आणि वृक्षप्रेम वारंवार अधोरेखित केले जाते; मात्र वृक्षसंवर्धनासाठी कृतिशील पाऊल टाकताना अनेकांचे पाय मागे पडतात. शहरातील रविवार कारंजा येथील एक गायधनी कुटुंब मात्र याला अपवाद आहे. आईच्या निधनानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी लाकडांच्या वापराला या कुटुंबाने फाटा देत समाजापुढे वेगळा आदर्श ठेवला.रविवार कारंजा भागात राहणाऱ्या श्रीनिवास व राजेंद्र गायधनी यांच्या मातोश्री मीरा नारायण गायधनी (८०) यांचे निधन झाले. त्यांनी मातोश्रींच्या पार्थिवाचे अंत्यसंस्कार पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेत तो अमरधाममध्ये अंमलात आणला. दोन वर्षांनंतर प्रथमच एखाद्या कुटुंबाने शहरात अशाप्रकारचा पायंडा पाडला. दोन वर्षांपूर्वी अशा पद्धतीने दोन पार्थिवांचे अंत्यसंस्कार करण्यात आले होते; मात्र यानंतर कोणीही यापद्धतीने अंत्यसंस्कार करण्याकरिता पुढे आले नाही. मंगळवारी (दि.२५) ‘शतार्जी’ फाउंडेशनच्या आकांक्षा नाईक, नरहर गर्गे यांनी मनपाच्या माध्यमातून एका बेवारस मृतदेहावर अशारीतीने पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार केले होते. यानंतर गायधनी कुटुंबाने मातोश्रींच्या पार्थिवाचे पर्यावरणपूरक दहन करण्याचा निर्णय बोलून दाखविला. त्यासाठी शतार्जी या संस्थेने त्यांना शेतकच-यापासून तयार केलेले १ किलो ठोकळे (ब्रिकेट्स) पुरविले. ठोकळे, गोव-या, खोब-याच्या वाट्या, कापूरवड्यांचा वापर करत संपूर्णत: पर्यावरणपूरक पद्धतीने गायधनी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, चार मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
पर्यावरणपुरक अंत्यसंस्कार : गायधनी कुटुंबियांनी वाचविला एक वृक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 19:30 IST
रविवार कारंजा भागात राहणाऱ्या श्रीनिवास व राजेंद्र गायधनी यांच्या मातोश्री मीरा नारायण गायधनी (८०) यांचे निधन झाले. त्यांनी मातोश्रींच्या पार्थिवाचे अंत्यसंस्कार पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेत तो अमरधाममध्ये अंमलात आणला.
पर्यावरणपुरक अंत्यसंस्कार : गायधनी कुटुंबियांनी वाचविला एक वृक्ष
ठळक मुद्देअंत्यसंस्कारसाठी लाकडांच्या वापराला फाटा वृक्षसंवर्धनासाठी कृतिशील पाऊल