पाटबंधारे खात्याच्या कर्मचाऱ्यांना डांबले मंदिरात

By Admin | Updated: August 23, 2015 00:16 IST2015-08-23T00:14:13+5:302015-08-23T00:16:22+5:30

‘कडवा’चे पाणी पेटले : आवर्तन सोडून तीन आठवडे झाले तरी पाणी मिळत नसल्याने शेतकरी संतप्त

For the employees of the Irrigation Department, in the Dumbela temple | पाटबंधारे खात्याच्या कर्मचाऱ्यांना डांबले मंदिरात

पाटबंधारे खात्याच्या कर्मचाऱ्यांना डांबले मंदिरात

सिन्नर : कडवा कालव्यास आवर्तन सोडून तीन आठवड्यांचा कालावधी उलटल्यानंतरही सिन्नरच्या पूर्वभागात शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहचत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी पाटबंधारे खात्याच्या तीन कर्मचाऱ्यांना सुमारे साडेतीन तास मंदिरात डांबून ठेवल्याची घटना धनगरवाडी येथे घडली. आमदार राजाभाऊ वाजे यांनी घटनास्थळी धाव घेऊन शेतकऱ्यांची समजूत काढत पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. वाजे यांच्या मध्यस्थीनंतर तीन दिवसात शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहचविण्याचे उपविभागीय अभियंत्यांकडून आश्वासन मिळाल्यानंतर सुमारे साडेतीन तासानंतर कडवाच्या पाटबंधारे खात्याच्या कर्मचाऱ्यांची मंदिरातून सुटका करण्यात आली.
कडवा कालव्यास ३१ जुलै रोजी म्हणजे सुमारे २३ दिवसांपूर्वी ३२५ क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. तीन आठवडे उलटल्यानंतरही सिन्नर तालुक्याच्या पूर्वभागात शेवटच्या टोकापर्यंत अद्याप पाणी पोहचलेले नाही. साधारणत: पंधरा दिवसात शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहचणे अपेक्षित होते. मात्र पाटंबधारे खात्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात चोरी होत असल्याचा आरोप धनगरवाडी, निमगाव-देवपूर, पंचाळे, शिंदेवाडी, उजनी, रामपूर व खडांगळी येथील शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे पाणी पोहचण्यास विलंब होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
पाण्याचे आवर्तन ४५ दिवस राहणार असले तरी निम्मे दिवस उलटून गेल्यानंतरही पाणी केवळ ७८ किलोमीटरपर्यंत पोहचल्याने शेतकरी संतप्त झाले.
शेवटच्या ८८ किलोमीटरपर्यंतच्या टोकापर्यंत पाणी पोहचण्यास विलंब होत असल्याने शेतकऱ्यांचा संयम सुटला. शनिवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास कडवा कालव्याचे शाखा अभियंता बी.एस. कटके, कालवा निरीक्षक बी.एस. सोळसे, मोजणीदार बी.एम. शिंदे धनगरवाडी येथे
आले.
संतप्त शेतकऱ्यांनी त्यांना अद्याप पाणी धनगरवाडीपर्यंत का पोहचले नाही याचा जाब विचारण्यास प्रारंभ केला. पाण्याची चोरी रोखण्यास कर्मचारी असमर्थ असल्याचा आरोप करीत संतप्त शेतकऱ्यांनी केला. पाणी चोरीस पाटबंधारे खात्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचाच आशीर्वाद असल्याचा गंभीर आरोप यावेळी शेतकऱ्यांनी करीत या तिघा कर्मचाऱ्यांना धनगरवाडी येथील मारुती मंदिरात डांबून टाकण्यात आले.
मंदिरात डांबून ठेवलेल्या कर्मचाऱ्यांनी उपविभागीय अभियंता प्रशांत सगभोर यांच्यासोबत भ्रमणध्वनीहून संपर्क साधून आपल्याला शेतकऱ्यांनी डांबून ठेवले असल्याची माहिती दिली. सगभोर यांनी शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी सकाळी ११ वाजेच्या सुमारास धनगरवाडी येथे धाव घेतली. संतप्त शेतकऱ्यांनी पाणीचोरी होत असल्यानेच पाणी पोहचत नसल्याची तक्रार यावेळी केली.
काही शेतकऱ्यांनी आमदार राजाभाऊ वाजे यांच्यासोबत संपर्क साधून पाटबंधारे खात्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मंदिरात डांबले असल्याची माहिती दिल्यानंतर वाजे यांनी तातडीने धनगरवाडी येथे धाव घेतली. वाजे यांनी शेतकऱ्यांची समजूत काढून सगभोर यांच्यासोबत चर्चा केली. सुमारे तासभर शेतकऱ्यांनी समस्यांचा पाढा वाचल्यानंतर सगभोर यांनी तीन दिवसात शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहचविण्याचे आश्वासन दिले. वाजे यांच्या मध्यस्थीनंतर दुपारी १ वाजेच्या सुमारास शाखा अभियंता, कालवा निरीक्षक व मोजणीदार या तीन कर्मचाऱ्यांची मंदिरातून सुटका करण्यात आली.
यावेळी खंडेराव डुंबरे, अशोक गायकवाड, अशोक हांडोरे, अण्णा डुंबरे, वाल्मीक हांडोरे, कैलास डुंबरे, शिवाजी तळेकर, रेवळनाथ थोरात, बाळू सोनवणे, गोरख सोनवणे, संदीप डुंबरे, शिवाजी घुले, सुभाष शिंदे, राधाकिसन डुंबरे, गोवर्धन शिंदे, बाळा देवगिरे, बाबासाहेब डुंबरे, दिलीप डुंबरे, साहेबराव डुंबरे, राजेंद्र संबेराव, हरिष डुंबरे, शंकर डुंबरे, भाऊसाहेब डुंबरे, ज्ञानदेव डुंबरे, शरद डुंबरे यांच्यासह धनगरवाडी, उजनी, शिंदेवाडी, पंचाळे येथील शेकडो शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: For the employees of the Irrigation Department, in the Dumbela temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.