गोदाकाठ परिसरात कांदा साठवणुकीवर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 19:05 IST2021-04-25T18:59:17+5:302021-04-25T19:05:34+5:30
चांदोरी : निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसरात उन्हाळ कांदा साठवणुकीकरिता शेतकरी धावपळ करीत आहेत. सध्या गोदाकाठ भागात कांदा चांगला पिकला आहे. गेल्या वर्षभरापासून गारपीट, अवकाळी पाऊस या संकटावर मात करुन कसाबसा कांदा पिकवला आणि हाच कांदा आता बाजारात आठशे ते अकराशे भावात विकला जातो आहे. त्यामुळे उत्पादन खर्चसुद्धा निघत नाही. कांद्याचे चांगले उत्पादन मिळाले असून बाजारभाव मिळत नसल्याने कांदा साठवणूक केल्याशिवाय पर्याय नाही.

चाळीत साठवण करताना शेतकरी.
चांदोरी : निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसरात उन्हाळ कांदा साठवणुकीकरिता शेतकरी धावपळ करीत आहेत. सध्या गोदाकाठ भागात कांदा चांगला पिकला आहे. गेल्या वर्षभरापासून गारपीट, अवकाळी पाऊस या संकटावर मात करुन कसाबसा कांदा पिकवला आणि हाच कांदा आता बाजारात आठशे ते अकराशे भावात विकला जातो आहे. त्यामुळे उत्पादन खर्चसुद्धा निघत नाही. कांद्याचे चांगले उत्पादन मिळाले असून बाजारभाव मिळत नसल्याने कांदा साठवणूक केल्याशिवाय पर्याय नाही.
गेल्यावर्षी उन्हाळी कांद्याचे भरपूर प्रमाणात उत्पादन झाल्याने तेव्हा कांदा काढणीच्या वेळेस आज ज्या भावात कांदा विकला जात आहे. त्याच भावात गेल्यावर्षी विकला जात होता, तेव्हा पुढे भाववाढ होईल या आशेवर शेतकऱ्याने चाळीत कांदा साठवणूक केली होती. परंतु पूर्ण वर्षभर कांद्याच्या भावात वाढ झाली नाही. कांद्याच्या भावात वाढ होईल या आशेवर नोव्हेंबर महिन्यापर्यंत ठेवला परंतु भाव वाढला नाही. तेव्हा कांदा चाळीत सडला. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती डबघाईस आली. हा कांदा चाळीतून काढून उकिरड्यावर फेकावा लागला. तरीही या वर्षी मोठ्या हिमतीने शेतकऱ्याने कांद्याची लागवड केली आहे. या कांदापिकासाठी उधार, उसनवार पैसे आणून उन्हाळी कांद्याची लागवड केली आहे. परंतु पाहिजे तसा भाव नसल्याने तो चाळीत ठेवत आहेत.
यावर्षी चांगल्या वातावरणामुळे अल्पसा पाऊस असूनही शेतकरी वर्गाला कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर साधले आहे. मात्र उत्पादन खर्च १५०० रुपये एकरी असताना कांद्याला मिळत असलेल्या सरासरी ८०० ते ११०० बाजारभावामुळे शेतकरी वर्ग कांदा साठवणुकीस जोर देऊ लागला आहे. मातीमोल दरात कांदा देण्यापेक्षा शेतकरी साठवण करण्यास अधिक पसंती देत असल्याने सध्या गोदाकाठ परिसरात कांदा साठवणूक करतानाचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळत आहे.
निफाड तालुक्यातील बहुतांश सर्वच गावात कांदा लागवड केली जाते. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात कांद्याला चांगलाच भाव मिळाला होता व बाजारमध्ये त्याचा तुटवडादेखील निर्माण झाला होता. तेव्हा उच्चांकी १२००० रुपये प्रतिक्विंटल इतका भाव होता; मात्र सध्या भाव कमी असल्याने शेतकरी कांदा साठवणुकीवर भर देत आहे. दरवर्षी सर्वसाधारण शेतकरी दोनशे ते तीनशे क्विंटल कांद्याची चाळीत साठवणूक करीत होता.
यावर्षी कांदा पिकास पोषक वातावरण असल्याने शेतकरी वर्गास अपेक्षेपेक्षा अधिक उत्पन्न साधल्याने साठवणुकीच्या क्षमतेपेक्षा अधिक उत्पन्न मिळाल्याने तसेच सध्या कांद्यास सरासरी सातशे ते हजार रुपयापर्यंत बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी कांदा साठवणुकीवर भर देऊ लागला आहे. अनेक शेतकऱ्यांनी कांदा साठवणुकीसाठी कायमस्वरूपी केलेल्या सोयी कांदा चाळी भरून गेल्याने अनेक परिसरात तात्पुरते कुड व अन्य सोयी उभारून कांदा साठविण्याची तयारी करीत आहे.
कांद्याला उत्पादन १५०० ते १७०० रुपये एकरी खर्च येतो आणि सध्या कांदा बाजारभाव ८०० ते ११०० च्या दरम्यान असल्याने उत्पादन खर्च निघत नसल्याने कांदा साठवणुकीवर भर दिला जात आहे.
- कैलास हांडगे, शेतकरी, चाटोरी.