वीज वितरणने दिला बिलवाढीचा शॉक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 01:01 IST2019-07-14T23:00:33+5:302019-07-15T01:01:17+5:30
विंचूरदळवी येथे गत महिन्यात एका ग्राहकाने वीजबिल भरलेले असताना व अनावश्यक वापर नसतानाही जुलै महिन्यात त्यास चक्क लाखाचे बिल आल्याने परिसरातील ग्राहकांकडून संताप व्यक्त होत आहे.

वीज वितरणने दिला बिलवाढीचा शॉक!
सिन्नर : तालुक्यातील विंचूरदळवी येथे गत महिन्यात एका ग्राहकाने वीजबिल भरलेले असताना व अनावश्यक वापर नसतानाही जुलै महिन्यात त्यास चक्क लाखाचे बिल आल्याने परिसरातील ग्राहकांकडून संताप व्यक्त होत आहे. याबाबत महाराष्टÑ क्रांती सेनेच्या वतीने महावितरणाच्या पांढुर्ली येथील सहायक उपअभियंत्यांना निवेदन देऊन याबाबत योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.
विंचूरदळवी येथील गोरख साहेबराव शेटे या ग्रामस्थास फेबु्रवारी महिन्यात ३२० रुपये वीजबिल आले होते. नंतर जुलै महिन्यात एक लाख ५ हजार ७५० रुपये इतके बिल महावितरणाकडून देण्यात आले. तसेच भरत वाकचौरे, सखाराम रोहिमल, महिंद्र साबळे, बाळा बर्वे, महम्मद मसूर, महम्मद सुबान अन्सारी, राजेंद्र रोहिमल, रखुबाई येडे, सुनीता हिवाळे, विजय कोकणे, विंचूरदळवीसह परिसरातीत घोरवड, आगसखिंड, पांढुर्ली, बोरखिंड परिसरातील वीजग्राहकांना गेल्या सहा महिन्यांपासून वाढीव वीजबिले येत आहेत.
निवेदनावर महाराष्टÑ क्रांती सेनेचे तालुकाध्यक्ष गोपाल गायकर, उपाध्यक्ष कैलास दातीर, चंद्रकांत डावरे, संजय तुपे, भाऊसाहेब पिंगळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
वीज वितरण कंपनीकडे याबाबत तक्रार केली असून, बिल ठेकेदार यांनी सदर मीटर बदलण्यासाठी आमच्याकडून दहा हजार रुपये
घेतले. पावती नंतर मिळेल असे सांगून नंतर ती देण्यास टाळाटाळ केली. परिसरात इतरही ग्राहकांना अशीच वाढीव बिले, वारंवार मीटर बदलण्यास सांगणे कोणत्याही कारणाने पैसे घेणे असे प्रकार वारंवार घडत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.