वृध्द भुधारकाची निर्घृणपणे हत्या : रम्मी-जिम्मी राजपुत यांना सात दिवसांची पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2021 14:34 IST2021-10-07T14:30:54+5:302021-10-07T14:34:16+5:30
कधी पंजाब तर कधी हरियाणा आणि नंतर हिमाचलप्रदेश, उत्तराखंड या राज्यांत ठावठिकाणे बदलणाऱ्या या दोघा संशयितांच्या मुसक्या गुन्हे शाखा युनीट-१च्या पथकाने उत्तराखंड, हिमाचलप्रदेशमधून आवळल्या.

वृध्द भुधारकाची निर्घृणपणे हत्या : रम्मी-जिम्मी राजपुत यांना सात दिवसांची पोलीस कोठडी
नाशिक : आठ महिन्यांपुर्वी गंगापुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आनंदवली येथे एका वृध्द भुधारकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या खुनाच्या गुन्ह्यामागे भुमाफियांच्या टोळीचा हात असल्याचे पोलीस तपासात पुढे आले. तेव्हापासून टोळीप्रमुख रम्मी परमजितसिंग राजपुत, जिम्मी परमजितसिंग राजपुत हे दोघेही संशयित आरोपी फरार झाले होते. गुन्हे शाखा युनीट-१च्या पथकाने त्यांना अटक करुन गुरुवारी (दि.७) न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने पुढील गुरुवारपर्यंत (दि.१४) दोघांना पोलीस कोठडी सुनावली. .
जागेच्या व्यवहारातून भुमाफियांच्या टोळीने नियोजनबद्ध पद्धतीने संघटितपणे कट रचून भुधारक रमेश मंडलिक (७०) यांचा काटा फेब्रुवारी महिन्यात काढला होता. यासाठी एका होमगार्डला सुपारी देण्यात आली होती. या खुनाच्या गुन्ह्यात पोलिसांनी आतापर्यंत १४ संशयित आरोपींना गजाआड केले आहे. टोळीप्रमुख रम्मी-जिम्मी हे दोघेही बंधू नाशिक शहरातून नव्हे तर राज्यातून अन्य राज्यांत पसार झाले होते. तेव्हापासून पोलीस त्यांच्या मागावर होते; मात्र वायफायद्वारे एकमेकांच्या संपर्कात राहत सातत्याने कधी पंजाब तर कधी हरियाणा आणि नंतर हिमाचलप्रदेश, उत्तराखंड या राज्यांत ठावठिकाणे बदलणाऱ्या या दोघा संशयितांच्या मुसक्या गुन्हे शाखा युनीट-१च्या पथकाने उत्तराखंड, हिमाचलप्रदेशमधून आवळल्या. टोळीचा म्होरक्या पोलिसांच्या गळाला लागल्याने भूमाफीयांना जबर हादरा बसला आहे. खुनाच्या गुन्ह्याच्या तपासात पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी वैयक्तिक लक्ष घालत पर्दाफाश केला होता. त्यांच्याविरुध्द मोक्काअन्वये कारवाई केली आहे.जिल्हा सत्र न्यायालयात सरकारपक्षाकडून विशेष सरकारी वकील ॲड. सुधीर कोतवाल यांनी युक्तीवाद केला. उच्च न्यायालयासह अपर पोलीस महासंचालकांकडूनही मोक्काच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले गेले आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक आयुक्त डॉ. सिध्देश्वर धुमाळ हे करीत आहेत.
---
आठवडाभर पथक पंजाब, हिमाचलमध्ये
तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मिळालेल्या 'लोकेशन'च्या दिशेने वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक महेश कुलकर्णी, उपनिरीक्षक दिनेश खैरनार, विष्णू उगले, जाकीर शेख, अंमलदार येवाजी महाले, प्रशांत मरकड, महेश साळुंके, नीलेश पवार यांच्या पथकाने मार्गस्थ होत पंजाब गाठले. चंदीगड, अमृतसरमध्ये आठवडाभर तळ ठोकून तेथे शोध घेतला. तसेच तेथून हरियाणाच्या काही शहरांमध्ये रम्मी-जिम्मीचा शोध घेण्याचा प्रयत्न पथकाने केला, मात्र दोघांनी पलायन करत उत्तराखंड, हिमाचल प्रदेश गाठल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्याने पथकाने त्या दिशेने कूच केली. सर्वप्रथम जिम्मी यास उत्तराखंडच्या रामनगरमधून ताब्यात घेतल्यानंतर हिमाचलमधून रम्मीच्या मुसक्या आवळल्या.