एकलहरे : औष्णिक विद्युत केंद्रात संयुक्त जयंती उत्सव शक्तिमान पुरस्कार वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 00:31 IST2018-04-15T00:31:23+5:302018-04-15T00:31:23+5:30
एकलहरे : येथील नाशिक औष्णिक विद्युत केंद्र सार्वजनिक शिवजयंती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना शक्तिमानभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

एकलहरे : औष्णिक विद्युत केंद्रात संयुक्त जयंती उत्सव शक्तिमान पुरस्कार वितरण
एकलहरे : येथील नाशिक औष्णिक विद्युत केंद्र सार्वजनिक शिवजयंती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना शक्तिमानभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी डॉ. बाबासाहेबांचे कार्य व त्यांची धोरणे कुण्या एका समाजासाठी मर्यादित नव्हती तर सर्वस्पर्शी व मनुष्यकेंद्रित होती, असे प्रतिपादन ‘लोकमत’चे निवासी संपादक किरण अग्रवाल यांनी केले. वर्कर्स क्लब प्रांगणात शनिवारी दुपारी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वीज निर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता उमाकांत निखारे होते. प्रमुख पाहुणे म्हणून ‘लोकमत’चे निवासी संपादक किरण अग्रवाल, प्रमुख वक्ते माजी न्यायाधीश व आंबेडकरी साहित्याचे अभ्यासक अनिल वैद्य, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गांगुर्डे, उपमुख्य अभियंता सुनील इंगळे, राकेशकुमार कमटमकर, अधीक्षक अभियंता मनोहर तायडे, कल्याण अधिकारी निवृत्ती कोंडावले माजी सरपंच राजाराम धनवटे आदी मान्यवर उपस्थित होते. माजी न्यायाधीश अनिल वैद्य म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आरक्षणाचे धोरण तळागाळातील व सामाजिक, शैक्षणिक मागासलेल्यांसाठी होते. आंबेडकरांसोबत जातीभेदविरहित सर्व समाजाचे विचार करणारी मंडळी होती. प्रारंभी दीपप्रज्वलन करून बुद्धवंदना म्हणण्यात आली. प्रास्ताविक प्रकाश पवार यांनी केले. सूत्रसंचालन शशिकांत सोमवंशी व आभार श्रीकृष्ण अरखराव यांनी मानले. यावेळी सुभाष कारवाल, सुनील ढगे, सुरेश चौधरी, रामचंद्र शिंदे, संजय पवार, लीना पाटील, सागर जाधव, संतोष दरेकर, रवी मिसाळ, शशिकांत कुमावत आदींसह युनियनचे पदाधिकारी, कार्यकर्ते, कामगार उपस्थित होते.