Efficiency of Elections: Six Central Armed Police Force personnel to settle | निवडणूक दक्षता : बंदोबस्ताला ४०० केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे जवान
निवडणूक दक्षता : बंदोबस्ताला ४०० केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे जवान

ठळक मुद्देपोलीस आयुक्तालय हद्दीत चार विधानसभा मतदारसंघपोलिसांकडून सशस्त्र पथसंचलन

नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला केवळ आठवडा शिल्लक राहिला आहे. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने शहर पोलीस प्रशासन सज्ज झाले असून, निवडणुकीसाठी कोलकाता येथील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) दोन तुकड्या बंदोबस्तासाठी शहरात दाखल झाल्या आहेत. तसेच केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे एकूण ४०० जवानदेखील निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी लवकरच शहरात येणार असल्याची माहित्री सूत्रांनी दिली.
शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत चार विधानसभा मतदारसंघांत एकूण २५४ केंद्रांचे मिळून सुमारे १ हजार १५४ बूथ आहेत. यापैकी ३३ बूथ हे संवेदनशील आहेत. या सर्व बूथनिहाय पोलीस बंदोबस्ताची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. त्यानुसार सर्व उपआयुक्त, सहायक आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आपापसांत चर्चा करून देण्यात आलेला बंदोबस्त तैनात करणार आहेत. निवडणुकीचे मतदान शहरात सर्वच केंद्रांवर शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून सर्वोपरी प्रयत्न केले जात आहेत. कायदा सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले. सर्वाधिक संवेदनशील केंद्रे भद्रकाली व पंचवटी या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत असून, या भागात पोलिसांकडून सशस्त्र पथसंचलनदेखील केले जात आहे.
केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएसएफ) तसेच केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ), राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ)चे जवान निवडणूक बंदोबस्तासाठी शहरात दाखल होऊ लागले आहेत. त्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था नियमानुसार आयुक्तालयाकडून करण्यात आली असून, बंदोबस्तासाठी त्यांना अतिरिक्त वाहनेही पुरविण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

असा असेल बंदोबस्त
२५४ इमारतींमधील केंद्रांच्या १ हजार १५४ बूथवर ७३५ पोलीस शिपाई, ५७७ होमगार्ड बंदोबस्तावर राहणार आहेत. याव्यतिरिक्त निवडणूक काळात व प्रत्यक्ष मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी सहा उपआयुक्त, १९ सहायक आयुक्त, ७० पोलीस निरीक्षक, २०० सहायक निरीक्षक/उपनिरीक्षक, १९८ पुरुष शिपाई, सहायक पोलीस उपनिरीक्षक ते पोलीस शिपाई ३ हजार, ७०० होमगार्ड असा चोख बंदोबस्त तैनात राहणार आहे.


Web Title: Efficiency of Elections: Six Central Armed Police Force personnel to settle
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.