राष्ट्रवादीत अंतर्गत संघर्षाची धार
By Admin | Updated: November 6, 2014 00:22 IST2014-11-05T23:18:38+5:302014-11-06T00:22:05+5:30
जिल्हा परिषद : स्थायी समिती सदस्यपदावरून वाद

राष्ट्रवादीत अंतर्गत संघर्षाची धार
नाशिक : जिल्हा परिषद अध्यक्ष व विषय समिती सभापती निवडीवरून राष्ट्रवादीत अंतर्गत धुमसत असलेला वाद आता बाहेर येऊ लागला असून, त्याची प्रचिती जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सदस्यपदाच्या निवडणुकीत दिसून आली.
स्थायी समिती सदस्यपदाच्या दोन रिक्त जागांसाठी भुजबळ फार्मवरून शैलेश सूर्यवंशी व बाळासाहेब गुंड यांचे नाव निश्चित करण्यात येऊन तसा सांगावा अध्यक्ष व उपाध्यक्षांना धाडण्यात आला. प्रत्यक्षात या पदासाठी या दोघांव्यतिरिक्त राष्ट्रवादीच्याच संगीता राजेंद्र ढगे यांनीही अर्ज दाखल केला.
अर्ज माघारीच्या नियोजित वेळेत त्यांनी अर्ज माघार घ्यावा यासाठी त्यांच्यावर पदाधिकाऱ्यांसह वरून फोन येऊ लागले. त्यात राष्ट्रवादीच्या एका नेत्याने जिल्हा परिषदेच्या सभागृहात उपकक्षात बसलेल्या एका पदाधिकाऱ्याच्या फोनवरून संगीता ढगे यांच्याशी बोलणे केले. त्यात माघारीसाठी ढगे यांच्यावर दबाव टाकण्यात आल्याचे कळते. ‘लहान तोंडी मोठा घास घेऊ नका, तुम्ही पक्षाची शिस्त पाळा’ असे त्यांना सांगण्यात आले. मात्र सौ. संगीता ढगे यांनी त्या नेत्याला, प्रत्येक वेळी आम्हीच माघार घ्यायची काय? असे कळविल्याचे समजते.
सभागृहातही गोरख बोडके यांच्यासह राष्ट्रवादीच्या काही महिला सदस्यांनी ढगे यांना पाठिंबा देत, जर कोणी माघार घेत नसेल तर निवडणूक होऊ द्या, अशी सूचना केली, तर प्रवीण गायकवाड यांनी अध्यक्ष विजयश्री चुंबळे व उपमुख्य कार्यकारीअधिकारी संदीप माळोदे यांच्यावर हल्लाबोल करीत, येथे गरीब सदस्यांना काय चाललेय ते कळू द्या, छाननी कोण करणार अध्यक्ष की तुम्ही, असे खडसावले. त्यावर माळोदे यांनी, पीठासन अधिकारी अध्यक्षच असून, त्याच निर्णय घेतील, असे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)