मालेगाव शहराच्या पूर्व भागात लसीकरणाला नन्ना, आतापर्यंत ८.५ टक्केच लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:10 IST2021-06-17T04:10:47+5:302021-06-17T04:10:47+5:30
मालेगाव (शफीक शेख) : शहरात कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यात येत असली तरी पश्चिम भागात काहीसा प्रतिसाद मिळत असून ...

मालेगाव शहराच्या पूर्व भागात लसीकरणाला नन्ना, आतापर्यंत ८.५ टक्केच लसीकरण
मालेगाव (शफीक शेख) : शहरात कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यात येत असली तरी पश्चिम भागात काहीसा प्रतिसाद मिळत असून पूर्व भागात मात्र लसीकरणाबाबत उदासीनता आहे. मालेगाव शहराची लोकसंख्या ६ लाख ६७ हजार असून केवळ ८.५ टक्के लसीकरण झाले आहे. प्रारंभी गेले काही दिवस नागरिक लसीकरणाबाबत साशंक होते. त्यामुळे सहसा कुणी लसीकरणासाठी घराबाहेर पडताना दिसले नाही मात्र कोरोेेनाची दुसरी लाट आल्यानंतर जसजशी नागरिकांतील घबराट कमी झाली तसतसा लसीकरणाला प्रतिसाद मिळू लागला. मर्यादित डोस असल्याने सर्व नागरिकांना डोस मिळू शकले नव्हते; परंतु लस उपलब्ध झाल्यानंतर सोयगावसह पश्चिम भागात लोक डोस घेण्यासाठी गर्दी करू लागले . पूर्व भागात गैरसमज आणि उदासीनतेमुळे आजही नागरिक लस घेण्यासाठी घराबाहेेर पडत नसल्याचे दिसून आले.
शहरातील पूर्व भागात तरूणही लसीकरणासाठी पुढे येत नसताना काही सुशिक्षित ज्येष्ठ नागरिक वगळता निवडक लोक लस घेत आहेत. कॅम्प, सोयगाव, सटाणा नाका भागात मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक लस घेत आहेत. शहरातील आठ ते दहा नागरी आरोग्य केंद्रांवर लसीकरण करण्यात येत असून एका नागरी आरोग्य केंद्रावर सरासरी १०० डोस दिवसभरात दिले जात आहेत, तर काही केंद्रावर केवळ ५० डोस दिले जात आहेत.
-------------------------
मालेगाव शहरात सर्वात कमी लसीकरण झालेली केंद्र
केंद्राचे नाव, लसीकरण
अ) गयास नगर आरोग्य केंद्र- २७
ब) मदनीनगर आरोग्य केंद्र- ३०
क)अली अकबर दवाखाना - ८४
ड)सोमवार वार्ड नागरी आरोग्य केंद्र- १०१
------------------------------
शहरात सर्वात जास्त लसीकरण झालेले केंद्रे
केंद्राचे नाव
अ) वाडिया १ आरोग्य केंद्र - ७ हजार ४४५
ब)सोयगाव नागरी आरोग्य केंद्र- ७ हजार १५१
क)वाडिया २ आरोग्य केंद्र- ५ हजार ३९८
ड)कॅम्प वार्ड नागरी आरोग्य केंद्र- ५ हजार ४७
--------------------------
लसीकरण कमी होण्याची कारणे
नागरिकांकडून लसीकरणास नकार मिळत असल्याने पूर्व भागात लसीकरण कमी झाले. या भागात साक्षरतेचे प्रमाण कमी आहे. यंत्रमाग कामगार मोठ्या संख्येने असल्याने लसीकरणास बाहेर पडत नाहीत, शिवाय नागरिकांमध्ये लसीबाबत गैरसमज आहेत. लस घेतल्याने त्रास होतो. साईड इफेक्ट होतात असा समज आहे, त्यामुळे काही नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत उदासीनता असल्याने त्या भागात कोरोना लसीकरण कमी प्रमाणात झाले. (१६ मालेगाव येथील वाडिया लसीकरण केंद्रावर असलेला शुकशुकाट)
--------------------
मालेगावचे ८.५ टक्के लसीकरण
मालेगाव शहराची लोकसंख्या ६ लाख ६७ हजार असून केवळ ८.५ टक्के लसीकरण झाले आहे. शहरात लाभार्थीमध्ये आरोग्य कर्मचारी २ हजार ८८३, शासकीय कर्मचारी २ हजार ७९४, ६० वर्षांवरील नागरिक ६९ हजार १३१, ४० ते ६० वयोगटातील ८९ हजार ८७१ आणि १८ ते ४४ वयोगटातील २ लाख ९८ हजार ६७६ असे एकूण ४ लाख ६३ हजार ३५५ लाभार्थी आहेत. सर्वच आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिला डोस घेतल्याने शंभर टक्के लसीकरण झाले. तर १ हजार ८२८ आरोग्य कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला. ६३.४१ टक्के लसीकरण झाले. २ हजार ७९४ शासकीय कर्मचाऱ्यांनी पहिला डोस घेतल्याने शंभर टक्के लसीकरण झाले तर १ हजार ७६९ शासकीय कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला. ६३.३१ टक्के लसीकरण झाले. ६० वर्षांवरील ६९ हजार १३१ जणांपैकी १० हजार ६३९ जणांनी पहिला डोस घेतला. १५ टक्के लसीकरण झाले तर ४ हजार ७४८ जणांनी दुसरा डोस घेतला ६.८७ टक्के लसीकरण झाले. ४५ ते ६० वयोगटातील ८९ हजार ८७१ जणांपैकी १३ हजार १५९ जणांनी पहिला डोस घेतला.१४.६४ टक्के लसीकरण झाले तर २ हजार २०९ जणांनी दुसरा डोस घेतला. २.४६ टक्के लसीकरण झाले. १८ ते ४४ वयोगटातील २ लाख ९८ हजार ६७६ जणांपैकी २ हजार ४० जणांनी पहिला डोस घेतला. ०.६८ टक्के लसीकरण झाले. तर २१९ जणांनी दुसरा डोस घेतला.
------------------------------------
मालेगाव महापालिका आरोग्य विभागाला राज्य शासनाकडून जसजशा कोरोना लसीचे डोस मिळाले, त्या प्रमाणात लसीकरण करण्यात आले. येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात लसीचा साठा उपलब्ध होणार आहे. त्यावेळी नियोजन करून लसीकरणाची गती वाढविण्यात येईल. याकरिता मौलाना आणि यंत्रमागधारक यांची बैठक घेऊन जास्तीत जास्त यंत्रमाग कामगारांनी लस घ्यावी यासाठी प्रयत्न केले जातील.
- भालचंद्र गोसावी, मनपा आयुक्त, मालेगाव
===Photopath===
160621\16nsk_4_16062021_13.jpg
===Caption===
१७ मालेगाव वाडिया