नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के, आदिवासी भयभीत, रात्र काढताहेत जागून
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2017 21:42 IST2017-12-03T21:41:46+5:302017-12-03T21:42:21+5:30
कळवण (नाशिक)- दळवट परिसरातील भांडणे, कोसुर्डे, भाकुर्डे, जामले, दरेगाव, आमदर व वडाळा, जिरवाडे आदी दळवट परिसरातील भागात शनिवारी रात्री व आज रविवारी भूकंपाचे जोरदार धक्के बसल्याने परिसरातील आदिवासी बांधव भयभीत झाले

नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के, आदिवासी भयभीत, रात्र काढताहेत जागून
कळवण (नाशिक)- दळवट परिसरातील भांडणे, कोसुर्डे, भाकुर्डे, जामले, दरेगाव, आमदर व वडाळा, जिरवाडे आदी दळवट परिसरातील भागात शनिवारी रात्री व आज रविवारी भूकंपाचे जोरदार धक्के बसल्याने परिसरातील आदिवासी बांधव भयभीत झाले असून भूकंपाच्या धसक्याने आदिवासी रात्र जागून काढत आहे.
आज सकाळी भूकंपाचा बसलेला हा धक्का किती रिश्टर स्केलचा असेल हे समजू शकले नाही. सौम्य धक्के बसल्याने घरातील भांडे पडली, घरांवरील पत्रे हादरली. त्यामुळे परिसरातील लोकांमधे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दळवट हे तालुक्यातील भूकंपाचे केंद्रबिंदू असून याठिकाणी भूकंपमापक यंत्र बसविले देखील होते मात्र आज या ठिकाणी भूकंप मापक यंत्र अथवा धोक्याची सूचना देणारा सायरन नसल्याचे शासकीय यंत्रणेचे या परिसराकडे दुर्लक्ष आहे.
आज सकाळी मेरी येथे संपर्क साधला असता आज 11 वाजेपर्यंत येथील भूकंप मापक यंत्रावर नोंद नसल्याचे चारुलता चौधरी यांनी सांगितले तर भूकंपाबाबत तहसीलदार कैलास चावडे यांनी सौम्य धक्के बसले असून कुठेही मालमत्तेची अथवा जीवितहानी झाली नसल्याचे सांगितले. दरम्यान महसूल आणि पोलीस यंत्रणेने दळवट परिसरात भेटी देऊन आदीवासी बांधवांशी चर्चा करून दिलासा दिला.
रविवारी रात्री देखील परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले मात्र रात्र असल्याने फारसे लक्षात आले नाही. सकाळी जेव्हा 10 वाजून 20 मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसले, त्यावेळी घरातील भांडी, पत्र्यांना व घरांना हादरे जाणवले. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे दळवटचे सरपंच रमेश पवार, लक्ष्मण पवार, यशवंत पवार यांनी सांगितले. भूकंपाच्या ह्या जोराच्या धक्क्यामुळे आदिवासी बांधव भयभयीत झाले असून कुठलेही नुकसान झाले नसल्याचे आदिवासी बांधवांनी सांगितले.
दळवट व परिसर आदिवासी असून सन 1995 पासून भूकंप प्रवण क्षेत्र असल्याने या भागातील आदिवासी भागाकडे व जनतेकडे शासनाचे लक्ष केंद्रित करून विविध सुविधा पुरवाव्यात अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार यांनी केली आहे.