महापालिकेचे ‘ई-कनेक्ट अॅप’ गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 01:25 IST2019-04-09T01:24:52+5:302019-04-09T01:25:24+5:30
महापालिकेच्या वतीने तक्रार निवारण करण्यासाठी गेल्या वर्षी तयार करण्यात आलेले आणि सर्वाधिक चर्चेत ठरलेले ई-कनेक्ट अॅप गुगलच्या प्ले स्टोअरवरून अचानक गायब झाले असून, त्यामुळे नव्याने डाउनलोड करणाऱ्यांचे हाल होत आहेत.

महापालिकेचे ‘ई-कनेक्ट अॅप’ गायब
नाशिक : महापालिकेच्या वतीने तक्रार निवारण करण्यासाठी गेल्या वर्षी तयार करण्यात आलेले आणि सर्वाधिक चर्चेत ठरलेले ई-कनेक्ट अॅप गुगलच्या प्ले स्टोअरवरून अचानक गायब झाले असून, त्यामुळे नव्याने डाउनलोड करणाऱ्यांचे हाल होत आहेत. सध्या एनएमई ई-कनेक्ट नाव टाकल्यानंतर थेट नवी मुंबई महापालिकेचे एनएमएसी हे अॅप डाउनलोड होत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
महापालिकेच्या वतीने यापूर्वी अॅप तयार करण्यात आले होते. परंतु ते फार वापरात नव्हते. गेल्यावर्षी महापालिकेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यात सुधारणा करून एनएमसी कनेक्ट हे अॅप लाँच केले. त्यात नागरिकांनी तक्रार केल्यानंतर थेट ती विभागीय अधिकारी स्तरावरील अधिकाऱ्याकडे जाते आणि त्यांनी ती तक्रार न उघडल्यास चोवीस तासांनी ही जाहिरात खाते प्रमुखांकडे वर्ग होते. जो अधिकारी तक्रारीची दखल घेत नाही त्याला स्वयंचलित पद्धतीने कारणे दाखवा नोटीस दिली जाते. खातेप्रमुखांनी जरी अशाप्रकारची दखल घेतली नाही, तर त्यांनाही नोटीस पाठविली जाते.
मनपा म्हणते थोड्याच दिवसांत उपलब्ध
महापालिकेच्या आयटी विभागाच्या सूत्रांनी सध्या अॅप उपलब्ध नाही हे मान्य केले. गुगल सर्वच अॅपची तपासणी करून री प्लॅटफॉर्म करणार आहे. तथापि, त्यामुळे काहीकाळ हे अॅप नव्याने डाउनलोड करता येणार नाही, असे सांगितले. यापूर्वी अॅप डाउनलोड करणाऱ्यांना मात्र कोणतीही अडचण नाही, ते नियमित त्याचा वापर करू शकतात, असेही सूत्रांनी सांगितले.