भगूर बसस्थानकात प्रवाशांना धुळीचा त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 12:40 AM2019-04-23T00:40:30+5:302019-04-23T00:41:18+5:30

भगूर बसस्थानकाच्या नूतनीकरणामुळे स्थानकाशेजारील मोकळ्या भूखंडावर स्थलांतरित झालेल्या बसस्थानकातील धुळीचा प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहेच, शिवाय महामंडळाने अन्य कोणतीही सुविधा उपलब्ध करून न दिल्याने प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

Dust troubles to passengers in Bhagur bus station | भगूर बसस्थानकात प्रवाशांना धुळीचा त्रास

भगूर बसस्थानकात प्रवाशांना धुळीचा त्रास

googlenewsNext

भगूर : भगूर बसस्थानकाच्या नूतनीकरणामुळे स्थानकाशेजारील मोकळ्या भूखंडावर स्थलांतरित झालेल्या बसस्थानकातील धुळीचा प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहेच, शिवाय महामंडळाने अन्य कोणतीही सुविधा उपलब्ध करून न दिल्याने प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
भगूरसह आजूबाजूच्या खेड्यापाड्यांसाठी भगूर बसस्थानक अत्यंत महत्त्वाचे असल्याने या स्थानकातून शहर आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक केली जाते. सध्या या स्थानकाचे नूतनीकरण सुरू असल्याने जवळच मोकळ्या भूखंडावर येथील सर्व प्रवासी वाहतूक स्थलांतरित करण्यात आलेली आहे. मात्र तेथे बस प्रवाशांना कुठल्याही अत्यावश्यक सुविधा पुरविल्या नसल्याने उन्हातान्हाचा प्रवाशांना त्रास होत असल्याने प्रवासी वर्गात मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे.
स्थानकाच्या कामकाजामुळे जवळच्याच मोकळ्या मैदानात तात्पुरती बस वाहतूक व्यवस्था सुरू करण्यात आली असली तरी त्यामुळे प्रवाशांची गैरसोयच अधिक झाली आहे.
या ठिकाणी बसण्याची व्यवस्था तर नाहीच, शिवाय प्रवासी निवाराशेड, पिण्याचे पाणी किंवा स्वच्छतागृह अशी कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने तीव्र नाराजी आहे. निवाराशेड नसल्यामुळे प्रवाशांना रणरणत्या उन्हात ताटळत उभे रहावे लागत आहे. शाळेचे विद्यार्थी, वयोवृद्ध ताटकळत बसची वाट पाहत उभे राहतात.
ग्रामीण भागातील सर्वांत मोठे बसस्थानक म्हणून भगूर स्थानकाचा उल्लेख होतो. या बसस्थानकातून बार्नस्कूल, लहवित, साउथ, वंजारवाडी, साकुर, कवडधरा, धामनगाव, घोटी, इगतपुरी तसेच राहुरी, विंचुरी, पांढुर्ली, शिवडा, घोरवड, कोनांबे, सिन्नर तसेच भगूर, देवलाली, नाशिकरोड, द्वारका, नाशिक, शालिमार, सीबीएस, पंचवटी, भगूर- पुणे, भगूर-पेठ आदी ठिकाणी बसेस धावतात. त्यामुळे बस डेपोला लाखोंचे उत्पन्न मिळते. तरीही परिवहन मंडळाचे प्रवाशांकडे लक्ष नाही. भगूर परिसरातील नागरिकांनी परिवहन मंडळाकडे अनेक तक्र ारी करूनही दखल घेतली जात नाही.  राज्य परिवहन महामंडळाने तात्पुरते शेड बांधून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी प्रवासी विजय सोनवणे, रमेश कांबळे, नरेश जगताप, शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिलांनी केली आहे.
एका झाडाचा निवारा
या विस्तीर्ण मोकळ्या भूखंडावर एकमेव झाड असून, ते फार दाट नाही. या झाडाच्या सावलीत प्रवाशांना उभे रहावे लागते, तर अन्य प्रवाशांना रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाचा आसरा घ्यावा लागतो. बस आली की धावत जाऊन पकडावी लागते. अनेक प्रवासी जवळपासचे दुकान, रसवंतीचा आसरा घेऊन उभे असतात.

Web Title: Dust troubles to passengers in Bhagur bus station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक