‘सीआयएसएफ’च्या परिक्षेत डमी उमेदवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 16:54 IST2019-09-08T16:52:25+5:302019-09-08T16:54:59+5:30
लेखी परिक्षेसाठी त्याच्या वतीने डमी उमेदवार बसविल्याचा प्रकार उघडकीस आल्याने त्याच्यासह त्या डमी उमेदवाराविरूध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

‘सीआयएसएफ’च्या परिक्षेत डमी उमेदवार
नाशिक : नाशिकरोड येथील नेहरूनगरच्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) मैदानावर उमेदवार भरती प्रक्रीया राबविली जात आहे. या भरती प्रक्रियेच्या लेखी परिक्षेत चक्क एक डमी उमेदवार आढळून आल्याने दोघा संशयितांविरूध्द उपनगर पोलिसांनी कायदेशीर कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल हे अर्धसैनिकांचे दल असून सरकारी कार्यालयांना सुरक्षा व संरक्षण प्रदान करणे हे या दलाचे मुख्य कार्य आहे. १९६९ साली भारतात सीआयएसफची स्थापना करण्यात आली. नाशिकरोड परिसरात भारत प्रतिभूती मुद्रणालय, चलार्थपत्र मुद्रणालयाच्या सुरक्षेची जबाबदारी सीआयएसएफकडे आहे. येथील मैदानावर स्टाफ सिलेक्शन कॉन्स्टेबलची भरती प्रकीया राबविली जात आहे. या भरतीप्रक्रियेअंतर्गत घेतल्या जाणाऱ्या लेखी परिक्षेत डमी उमेदवार आढळून आल्याने कमान्डंट परमजित सिंग (रा.नेहरूनगर), यांनी उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार संशयित उमेदवार अनिकेत कैलास जाधव (२१, रा भोकरदन, जि.बुलढाणा) याच्यासह त्याचा साथीदाराविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाधव याने आॅनलाइन पध्दतीने घेतल्या जाणा-या लेखी परिक्षेसाठी त्याच्या वतीने डमी उमेदवार बसविल्याचा प्रकार उघडकीस आल्याने त्याच्यासह त्या डमी उमेदवाराविरूध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरिक्षक एस.जी.जगदाळे करीत आहेत.