नाफेडद्वारे खरेदी नसल्याने कळवणला शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2023 12:12 IST2023-08-24T12:11:41+5:302023-08-24T12:12:58+5:30
आवारात प्रवेशद्वारावर दिला ठिय्या

नाफेडद्वारे खरेदी नसल्याने कळवणला शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडला
मनोज देवरे, कळवण (जि नाशिक)- लोकनेते ए टी पवार कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नाकोडा उपआवारात आज कांदा लिलाव पूर्ववत झाले. सकाळी पीक अप वाहनातील कांदा लिलाव झाल्यानंतर नाफेडद्वारे खरेदी होतं नसल्याचे निदर्शनास आल्यावर कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने कांदा लिलाव बंद पाडून उपआवारांच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले.
घटनास्थळी सभापती धनंजय पवार, संचालक योगेश शिंदे सचिव रविंद्र हिरे यांनी धाव घेऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. सभापती धनंजय पवार यांनी नाफेडद्वारे खरेदी संदर्भात जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याशी बोललो आहे. वरिष्ठ यंत्रणेकडे मागणी केल्याचे सांगितले. आंदोलनस्थळी तहसीलदार रामदास वारुळे पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी धाव घेऊन शेतकऱ्यांची मागणी समजून घेतली.
जिल्हाधिकारी यांच्या पर्यंत आपल्या भावना व रास्त मागण्या पोहचवून नाफेडमार्फत खरेदीसाठी प्रयत्न करणार असे आश्वासन दिल्यानंतर लिलाव पूर्ववत सुरु झाले. आंदोलनाचे नेतृत्व कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष विलास रौदंळ यांनी केले. शेकडो शेतकरी ठिय्या आंदोलनात सहभागी झाले होते.