अपुऱ्या माहितीमुळे योजनेपासून वंचित
By Admin | Updated: April 9, 2015 00:36 IST2015-04-09T00:25:33+5:302015-04-09T00:36:08+5:30
जननी सुरक्षा : पंचवटी रुग्णालयातील प्रकार

अपुऱ्या माहितीमुळे योजनेपासून वंचित
हनुमानवाडी : महाराष्ट्र शासनाच्या जननी सुरक्षा योजनेची माहिती व्यवस्थित व परिपूर्ण दिली जात नसल्याने पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल मातांना या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे.
जननी सुरक्षा योजनेची माहिती मातांना देण्यात यावी आणि त्यांना या योजनेत सामावून घ्यावे, असे शासनाचे आदेश आहेत. शासकीय प्रसूतिगृहामध्ये या योजनेची जाहिरात अग्रभागी लावावी, त्यातून त्या योजनेची सर्व माहिती देण्यात यावी, असेही नियम आहेत. परंतु पंचवटीतील इंदिरा गांधी प्रसूतिगृह रुग्णालयात अर्धवट माहिती देण्यात आल्यामुळे मातांना या योजनेपासून वंचित रहावे लागत असल्याचा आरोप येथील काही रुग्णांच्या नातेवाइकांनी केला आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी जी काही कागदपत्रे लागतात त्याची माहिती लिहिण्यात आलेली आहे. परंतु आता रेशन कार्ड आणि आधार कार्डही आवश्यक असल्याने या कागदपत्रांचा मात्र उल्लेखच रुग्णालयांच्या माहिती फलकावर देण्यात आलेला नाही. त्यामुळे अनेकांना इंदिरा गांधी रुग्णालय ते जिल्हा रुग्णालयात चकरा माराव्या लागत आहे.
यासंदर्भात पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयात विचारणा केली असता फलकावरील माहिती जुनी असल्याचे सांगण्यात आले. आधार कार्ड, रेशन कार्ड लागते किंवा नाही याची माहिती नसल्याचे उत्तर संबंधिताना देण्यात आले. त्यांच्या या भूमिकेमुळे मातांना मात्र योजनेपासून वंचित रहावे लागत आहे. लागणाऱ्या कागदपत्रांच्या यादीत आधार आणि रेशन कार्ड लिहिलेला कागद चिकटविला तर प्रश्न मिटू शकेल; मात्र येथेही शासकीय कारभार आडवा येत असल्याचा अनुभव लाभार्थ्यांना येत आहे. (प्रतिनिधी)