लग्नास नकार दिल्याने काकावर झाडली गोळी
By Admin | Updated: April 10, 2015 00:17 IST2015-04-10T00:06:45+5:302015-04-10T00:17:16+5:30
सिडकोतील प्रकार : गोळीबार करणारा फरार

लग्नास नकार दिल्याने काकावर झाडली गोळी
सिडको : लग्नास नकार दिल्याचा राग मनात ठेवून तरुणाने आपल्याजवळील गावठी पिस्तुलातून गोळीबार करीत दहशत पसरविण्याचा प्रयत्न केल्याची घटना सायंकाळी सिडकोतील शिवपुरी चौकात घडली. या घटनेत मुलीचे काक बचावले असून, घटनेनंतर तरुण फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार संभाजी कडवे ऊर्फ संभ्या याचा पंचवटीतील एका मुलीशी विवाह ठरला होता. मात्र, आडगाव येथे राहणाऱ्या मुलीच्या काकांनी या लग्नास विरोध केला होता. संभाजी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने त्यांनी विरोध केला होता. याचा राग संभाजीच्या मनात होता. हाच राग मनात ठेवून कडवे हा वेळोवेळी मुलीच्या नातेवाइकांना दमबाजी करून वेठीस धरण्याचा प्रयत्न करीत असे. दरम्यान, गुरुवारी (दि.९) मुलीचे काका सिडको येथील शिवपुरी चौकात राहत असलेल्या त्यांच्या नातेवाइकांकडे आले असता, कडवे याने त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. वाद वाढत गेल्यानंतर संभाजीने गावठी पिस्तूल रोखून त्यांच्या दिशेने गोळीबार केला. मात्र, त्यांनी प्रसंगावधान दाखवित गोळी चुकविली. या घटनेमुळे परिसरात चांगलीच धावपळ उडाली. घटनास्थळी गर्दी झाल्याचे बघून कडवे याने पळ काढला.
माहिती मिळताच गुन्हे शाखेचे संदीप दिवाण, सहायक पोलीस आयुक्त अतुल झेंडे, दिनेश बर्डेकर यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. श्रीपाड कडवीलकर यांच्या तक्रारीनुसार अबंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)