सिन्नर तालुक्यात थंडीमुळे जनजीवन विस्कळीत
By Admin | Updated: January 23, 2016 22:50 IST2016-01-23T22:49:32+5:302016-01-23T22:50:32+5:30
नायगाव खोरे : रब्बीची पिके तरारल्याने शेतकऱ्यांत समाधान

सिन्नर तालुक्यात थंडीमुळे जनजीवन विस्कळीत
नायगाव : सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील नायगाव खोऱ्यात कडाक्याच्या थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. थंडीमुळे जनावरांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. मात्र, रब्बी हंगामातील पिके गारव्याने तरारली असल्याने शेतकरी-वर्गात समाधान व्यक्त होत आहे.
आठवडाभरापासून वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होऊन कडाक्याच्या थंडीचे आगमन झाले आहे. दिवसभरही जाणवणाऱ्या जोरदार थंडीमुळे दैनंदिन कामकाजाचे नियोजन कोलमडून पडत असल्याचे चित्र आहे. दिवसभरातील गारव्यासह सायंकाळी सहा ते सकाळी नऊ वाजेपर्यंत हुडहुडी भरवणारी थंडी दररोज पडत असल्यामुळे नित्याच्या दिनक्रमासह व्यवहारिक कामेही उशिराने सुरू होताना दिसत आहे. त्यामुळे सर्वच कामांचे वेळापत्रक विस्कटले आहे. थंडीपासून बचाव करणारे सर्व साधने या थंडीच्या कडाक्यात कुचकामी ठरत असल्याचे बोलले जात आहे. सकाळी दहा - अकरा वाजेपर्यंत सर्वत्र शेकोट्या पेटलेल्या दिसत असून, जनजीवनावर थंडीचा परिणाम दिसून येत आहे.
माणसांपेक्षा जनावरे व पक्ष्यांवर थंडीचा परिणाम जास्त दिसून येत आहे. पाळीव जनावरांच्या तुलनेत मोकाट जनावरे व कुत्र्यांना त्याचा अधिक फटका बसत आहे. सकाळच्या वेळेत शाळेत जाणारे विद्यार्थी व चाकरमान्यांना वेळेचे बंधन पाळताना चांगलीच धावपळ करावी लागत आहे. गेल्या काही दिवसांतल्या ढगाळ वातावरणामुळे खराब झालेली रब्बीतील पिके थंडीमुळे चांगलीच तरारली आहेत. दररोज वाढणाऱ्या थंडीमुळे पिकांवरील विविध कीटक, मावा, तुडतुड्यांचा प्रभाव कमी पडत असल्याने शेतमालात सुधारणा होतांना दिसून येत आहे. रब्बीच्या उत्पादनावर चांगला परिणाम दिसणार असल्याचे बोलले जात आहे. शेतमालाबरोबरच आरोग्यासाठीही हितावह असणाऱ्या थंडीचे प्रमाण वाढत राहिल्याने रुग्णांची संख्या वाढत आहे. (वार्ताहर)