मक्याच्या पोंग्याला बाटलीतून औषध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 16:44 IST2019-07-29T16:44:37+5:302019-07-29T16:44:51+5:30
लष्करी अळीचा प्रादुर्भाव : पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

मक्याच्या पोंग्याला बाटलीतून औषध
मानोरी : येवला तालुक्यात पाऊस मध्यम स्वरूपाचा पडत असला तरी यंदा मका पीक जगविण्यासाठी धडपड सुरू असल्याचे दिसून येत आहे. तीस दिवसांच्या मकाला प्रति एकर पंधरा हजार रु पयांपेक्षा अधिक खर्च येत असून मक्याला दोनदा औषधांची फवारणी करून देखील लष्करी अळीवर नियंत्रण मिळविता आलेले नाही. त्यामुळे हतबल झालेल्या शेतकरी वर्गाने एक लिटर क्षमतेच्या पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या भरून शेतातील प्रत्येक मक्याच्या झाडाच्या पोंग्यात औषध सोडण्याचा प्रयोग सुरू केला आहे.
मकाच्या पोंग्यात थेट औषध टाकल्याने लष्करी अळीवर काही प्रमाणात नियंत्रण येत असल्याचे शेतकरी वर्गाकडून सांगितले जात आहे. याआधी दोनदा औषध फवारणी करून झालेला खर्च पाण्यात गेला असून पाण्याच्या बाटलीचा औषध टाकण्यासाठीचा प्रयोग लाभदायक ठरतांना दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वीच येवला तालुक्यात राज्याचे प्रधान कृषी सचिव एकनाथ डवले यांनी लष्करी अळी ग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली. यावेळी शेतक-यांनी त्यांच्याकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. तीस दिवसांच्या मक्याला लष्करीअळीने घेरले असून या लष्करी अळीचा नायनाट करण्यासाठी तीन वेळेला औषध फवारणी करूनही औषधे अधिक प्रमाणात कडवट असल्याचे बोलले जात आहे. त्याचा परिणाम जनावरांच्या चा-यावर होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, वाड्यावस्त्यावर अद्यापही काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. मध्यम ते तुरळक स्वरूपाचा पाऊस पडत असल्याने शेतातील विहिरींना अद्याप त्याचा फायदा झालेला नाही.