गत वर्षाच्या तुलनेत जिल्ह्यात बाल मृत्यूत कमालीची घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 02:02 IST2021-07-01T02:01:02+5:302021-07-01T02:02:17+5:30
मातेच्या उदरात होणारे अल्प पोषण व जन्मत:च असणाऱ्या आजारांमुळे बालमृत्यूत होणारी वाढ रोखण्यास जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला यश मिळाले असून, गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत जानेवारी ते मे या पाच महिन्यात सुमारे दीडशे बालकांचा बळी गेलेला असताना यंदा मात्र हे प्रमाण अवघ्या ६५ वरच थांबले आहे.

गत वर्षाच्या तुलनेत जिल्ह्यात बाल मृत्यूत कमालीची घट
नाशिक : मातेच्या उदरात होणारे अल्प पोषण व जन्मत:च असणाऱ्या आजारांमुळे बालमृत्यूत होणारी वाढ रोखण्यास जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला यश मिळाले असून, गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत जानेवारी ते मे या पाच महिन्यात सुमारे दीडशे बालकांचा बळी गेलेला असताना यंदा मात्र हे प्रमाण अवघ्या ६५ वरच थांबले आहे. विशेष म्हणजे यंदा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत विषाणूचा प्रसार दुप्पट वेगाने वाढत असताना व ग्रामीण भागालाही त्याने कवेत घेतले असताना बालमृत्यू रोखण्यात यश आले आहे. नाशिक जिल्ह्यातील आठ तालुके आदिवासी असून, त्यातील ठरावीक गावे सोडता मोठ्या प्रमाणावर आदिवासींचे वास्तव्य दुर्गम भागातील पाडे, वाडे वस्तीवर आहे. शिक्षणाचा अभाव, अंधश्रद्धा व गरिबीमुळे या समाजात अल्पवयातच विवाह लावण्याची प्रथा असल्यामुळे परिणामी गरोदर राहणाऱ्या मातांचे पुरेसे पोेषण न होण्याचे तसेच उदरातील बाळाचीही योग्य वाढ होत नसल्यामुळे बाळंतपणातच बालमृत्यू होण्याचे प्रमाण यापूर्वी सर्वाधिक होते. आरोग्य सेवेचा अभाव व पारंपरिक वैद्यकीय उपचाराकडे असलेला कल यामुळे देखील बाल मृत्यूच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे वेळोवेळी निष्पन्न झाले आहे. मात्र गेल्या काही वर्षापासून महिला व बालकल्याण विभागाकडून गरोदर मातांना तिसऱ्या महिन्यापासूनच पोेषण आहार व पूरक औषधांचा पुरवठा केला जात असल्यामुळे त्यांचे उदरभरण व्यवस्थित होऊ लागल्याचा दावा आरोग्य विभागाकडून केला जात आहे. त्याचाच भाग म्हणून दरवर्षी बाल मृत्यूच्या प्रमाणात कमालीची घट होऊ लागली आहे.
गेल्या वर्षी जानेवारी ते मे या काळात १५१ बालकांचा मृत्यू झाला होता. त्यातही जन्मत:च मृत्यू झालेल्या बालकांची संख्या २७ तर जन्मल्यानंतर विविध आजारांनी मृत्यू पावलेल्यांची संख्या १२४ इतकी होती. यंदा मात्र हीच संख्या अवघी ६५ इतकी असून, त्यात जन्मत:च मृत्यू झालेल्यांची संख्या १९ तर विविध आजाराने त्रस्त असलेल्या बालकांची संख्या ४६ इतकी असल्याचे आरोग्य खात्याच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
चौकट===
आदिवासी तालुके हॉटस्पॉट
बाल मृत्यूत आदिवासी तालुके आघाडीवर असून, त्यातही सुरगाणा, पेठ, दिंडोरी व इगतपुरी या तालुक्यात मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. मात्र हे बालमृत्यू जन्मत:च झालेले नसून, जन्मल्यानंतर कुपोषण व तत्सम आजारामुळे मृत्यू झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. समाधानकारक बाब म्हणजे बाळंतपणातच बाल मृत्यू होण्याचे प्रमाण अगदीच अल्प आहे.