नाट्यछटा, एकांकिका वाचन रंगले
By Admin | Updated: July 28, 2015 01:21 IST2015-07-28T01:21:38+5:302015-07-28T01:21:40+5:30
नाट्य परिषद : ‘भ्रष्टाचार हटाव’चेही वाचन

नाट्यछटा, एकांकिका वाचन रंगले
नाशिक : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने आज सायंकाळी ‘भ्रष्टाचार हटाव’ नाट्यछटा व ‘प्रश्न संहितेचा’ या एकांकिकेच्या वाचनाचा कार्यक्रम रंगला.
नाट्य परिषदेच्या कालिदास कलामंदिरातील कार्यालयात हा कार्यक्रम झाला. मुकुंद गायधनी लिखित ‘भ्रष्टाचार हटाव’ ही नाट्यछटा अभिनेते राजेश शर्मा यांनी सादर केली. भ्रष्टाचाराला कंटाळून एक सामान्य माणूस त्याविरुद्ध बंड पुकारतो. दूधवाला, किराणावाल्यापासून ते खासगी क्लासेसकडून होणाऱ्या भ्रष्टाचाराला वाचा फोडली जाते; मात्र अखेरीस या लढ्यामुळे त्याचेच मानसिक संतुलन ढळल्याने कुटुंबीय त्याला वेड्यांच्या इस्पितळात दाखल करतात, असा या नाट्यछटेचा आशय होता. त्यानंतर ‘प्रश्न संहितेचा’ या मुकुंद गायधनी यांनीच लिहिलेल्या एकांकिकेचे त्यांच्यासह कृतार्थ कन्सारा, तेजस्विनी गायकवाड यांनी अभिवाचन केले. एका नाट्यसंस्थेचा लेखक अचानक गायब झाल्याने दहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या नाटकाच्या प्रयोगासाठी ऐनवेळी स्क्रिप्ट कोठून आणावे, अशी चर्चा एका नाट्यसंस्थेच्या तरुण कलावंतांत सुरू होते. त्यातून अनेक विषय उलगडले जातात. नानाविध विषय निघतात; पण कशावरच एकमत होत नाही. ही सगळी चर्चा गटातील एक मुलगी सर्वांच्या नकळत रेकार्ड करून ठेवते आणि अखेर या चर्चेवर आधारित नाटकच स्पर्धेत सादर करण्याची आगळी संकल्पना ती मांडते. सारे जण तिला एकमुखाने मान्यता देतात, अशी एकांकिकेची कथा होती.
कार्यक्रमाला महाकवी कालिदास कलामंदिराचे व्यवस्थापक प्रकाश साळवे, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम, प्रमुख कार्यवाह सुनील ढगे, प्रवीण कांबळे आदिंसह रसिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)