माझ्या अंत्यविधीला कोणालाही बोलावू नका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 00:41 IST2021-04-27T22:07:45+5:302021-04-28T00:41:57+5:30

देवळा : विवाह, अंत्यविधी व दशक्रिया विधीला होणारी गर्दी कोरोना संक्रमण वाढण्याचे प्रमुख कारण ठरत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर, शासनाने अशा कार्यक्रमांवर निर्बंध घालूनही गर्दी कमी होताना दिसत नाही. मात्र, मृत्यूच्या दारात असलेली एखादी व्यक्ती आपल्या मुलांजवळ कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी माझ्या अंत्यविधीला कोणालाही बोलावू नका, अशी अंतिम इच्छा व्यक्त करत सामाजिक हित जपते आणि मुलेही नातेवाईक व भाऊबंदांना तशी कल्पना देऊन अंत्यविधीला न येण्याची विनंती करतात. कापशी येथील भदाणे कुटुंबीयात ही घटना घडली आहे.

Don't call anyone to my funeral! | माझ्या अंत्यविधीला कोणालाही बोलावू नका!

दिनकर भदाणे

ठळक मुद्देअंतिम समयी इच्छा : कोरोना रोखण्यासाठी जपले सामाजिक हित

देवळा : विवाह, अंत्यविधी व दशक्रिया विधीला होणारी गर्दी कोरोना संक्रमण वाढण्याचे प्रमुख कारण ठरत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर, शासनाने अशा कार्यक्रमांवर निर्बंध घालूनही गर्दी कमी होताना दिसत नाही. मात्र, मृत्यूच्या दारात असलेली एखादी व्यक्ती आपल्या मुलांजवळ कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी माझ्या अंत्यविधीला कोणालाही बोलावू नका, अशी अंतिम इच्छा व्यक्त करत सामाजिक हित जपते आणि मुलेही नातेवाईक व भाऊबंदांना तशी कल्पना देऊन अंत्यविधीला न येण्याची विनंती करतात. कापशी येथील भदाणे कुटुंबीयात ही घटना घडली आहे.

कापशी येथील रहिवासी व जिल्हा बँकेचे माजी व्यवस्थापक दिनकर चिंधू भदाणे ( ८१) यांना दि. २२ एप्रिल रोजी हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यावेळी यांच्याजवळ त्यांचे ज्येष्ठ पुत्र चंद्रशेखर हे होते. वडिलांना तातडीने रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी चंद्रशेखर यांची धावपळ सुरू झाली. यावेळी दिनकररावांनी सर्व कुटुंबीयांना जवळ बोलावून सांगितले की, आता माझे काही खरे नाही, देशभरात कोरोनाने हाहाकार माजविला आहे. आपले नातेवाईक व मित्र परिवार मोठा आहे. अशा परिस्थितीत कुणालाही माझ्या अंत्यविधीला बोलावून धोका पत्करू नका, सर्वांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवा, अशी इच्छा व्यक्त करून त्यांनी जगाचा निरोप घेतला.
त्यांच्या इच्छेचा मान राखून त्यांची मुले चंद्रशेखर, सुनील आणि रमेश यांनी सर्व नातेवाईक व स्नेहींना दूरध्वनीद्वारे माहिती देऊन कोरोनाची भीषण परिस्थिती लक्षात घेता, अंत्यसंस्कार, तसेच मृत्यूपश्चात सांत्वनासाठी दारावर येणे व पुढील होणाऱ्या धार्मिक विधींसाठी कुणीही येऊ नये, अशी विनंती केली. आपल्या अंतिम समयी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी एखादी व्यक्ती आपली शेवटची इच्छाही समाजाचे हित पाहत असल्याची ही घटना चर्चेचा विषय बनली आहे.

अंत्यविधीला होणारी गर्दी हा प्रतिष्ठेचा विषय मानला जातो. आजच्या परिस्थितीत ही मनोवृत्ती बदलली पाहिजे. सर्वांचे आरोग्य महत्त्वाचे आहे. खोट्या प्रतिष्ठेपायी कुणाचाही जीव धोक्यात घालू नका, ही वडिलांची अंतिम इच्छा होती.
- चंद्रशेखर भदाणे, कापशी.

Web Title: Don't call anyone to my funeral!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.