Don’t be pessimistic about women’s complaints; Discussion of Chandramukhi Devi with Deepak Pandey | महिलांच्या तक्रारींबाबत उदासिनता नको; चंद्रमुखी देवींची दीपक पाण्डेय यांच्यासोबत चर्चा

महिलांच्या तक्रारींबाबत उदासिनता नको; चंद्रमुखी देवींची दीपक पाण्डेय यांच्यासोबत चर्चा

ठळक मुद्देराष्ट्रीय महिला आयोगाची आयुक्तालयाला सुचना

नाशिक : महिलांविषयक तक्रारी तत्परतेने दाखल करुन त्यांचा योग्यरित्या तपासी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत तपास व्हावा, तसेच पोलीस आयुक्तालयांतर्गत महिला सुरक्षा विभागाच्या ह्यभरोसा सेलह्णच्या सक्रीयतेबाबत शहर व परिसरात प्रचार-प्रसार करण्यावर अधिकाधिक भर देण्याची गरज असल्याचे मत नवी दिल्ली येथील राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य चंद्रमुखी देवी यांनी व्यक्त केले. त्यांनी पोलीस आयुक्तालयात आयुक्त दीपक पाण्डेय यांची शनिवारी (दि.२०) भेट घेत महिलांविषयक विविध मुद्द्यांवर चर्चा केली.

राष्ट्रीय महिला आयोगाच्या केंद्रीय सदस्य चंद्रमुखी देवी या शनिवारी नाशिक दौऱ्यावर होत्या. त्यांनी महिलांविषयीच्या विविध तक्रारींसंदर्भात पोलीस आयुक्तालयात आढावा घेतला. यावेळी पाण्डेय यांच्याशी त्यांनी चर्चा केली. विविध प्रकारे त्रासलेल्या महिला जेव्हा पोलिसांकडे मनामध्ये काही अपेक्षा घेऊन येतात, तेव्हा त्यांना सर्वप्रथम समजून घेतले पाहिजे. तसेच महिलांच्या संबंधित तक्रारी दाखल करुन घेण्यास कोणत्याहीप्रकारे पोलिसांकडून विलंब होता कामा नये, असेही देवी यांनी यावेळी सांगितले. अनेकदा पोलीस ठाण्यांकडून हद्दींचा प्रश्न पुढे करत महिलांची तक्रार दाखल करण्यासाठी विलंब लावला जातो, हे गैर असल्याचे त्या म्हणाल्या. महिला आयोगाकडून प्राप्त होणाऱ्या तक्रार अर्जाविषयी बोलताना त्या म्हणाल्या की जर तक्रार अर्ज आपल्या हद्दीतील नसतील तर उलट टपाली ते पुन्हा कार्यालयाला कळविण्यात यावे, जेणेकरुन संवादात कोठेही अंतर निर्माण होणार नाही.

महिलांविषयीच्या तक्रारींचा नाशिक शहरासह ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयांद्वारे आढावा जाणून घेतला असता शहरात व ग्रामीण भागात महिलांविषयक तक्रारी दाखल करुन त्यांचा होणारा निपटाऱ्याबाबत देवी यांनी समाधान व्यक्त केल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. यावेळी बैठकीला जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस.पी.पाटील, उपायुक्त विजय खरात, सहायक आयुक्त (गुन्हे) मोहन ठाकुर, सहायक आयुक्त (ग्रामीण) शाम निपुंगे, शहर महिला सुरक्षा विभागाच्या संगीता निकम आदी उपस्थित होते.
---

Web Title: Don’t be pessimistic about women’s complaints; Discussion of Chandramukhi Devi with Deepak Pandey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.