दोडीच्या शिक्षिकेचा प्रसूतीदरम्यान मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 14:11 IST2019-03-20T14:06:40+5:302019-03-20T14:11:19+5:30
सिन्नर : तालुक्यातील दोडी बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इयत्ता तिसरीच्या वर्गशिक्षिका अर्चना वाकचौरे (३४) यांचे प्रसूतीदरम्यान मंगळवार (दि. १९) रोजी नाशिक येथील खासगी रूग्णालयात निधन झाले.

दोडीच्या शिक्षिकेचा प्रसूतीदरम्यान मृत्यू
सिन्नर : तालुक्यातील दोडी बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इयत्ता तिसरीच्या वर्गशिक्षिका अर्चना वाकचौरे (३४) यांचे प्रसूतीदरम्यान मंगळवार (दि. १९) रोजी नाशिक येथील खासगी रूग्णालयात निधन झाले. या घटनेचे वृत्त कळताच दोडी शाळेत विद्यार्थ्यांसह सहकारी शिक्षकांना शोक अनावर झाला. सोमवारी (दि. १८) दुपारपर्यंत वाकचौरे शाळेत अध्यापन करत होत्या. मात्र, सायंकाळच्या सुमारास त्यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांना संगमनेर येथे खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, त्यांचा त्रास वाढल्याने त्यांना नाशिक येथील खासगी रूग्णालयात प्रसूतीसाठी हलविण्यात आले होते. मात्र प्रसूतीदरम्यानच मंगळवार (दि.१९) रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. मनिमळावू स्वभाव व शिस्तप्रिय असणाऱ्या अर्चना वाकचौरे यांच्या निधनाचे वृत्त समजताच माजी सरपंच पी. जी. आव्हाड, एकनाथ आव्हाड, ग्रामपंचायत सदस्य गणपत केदार, ब्रम्हानंद फाउंडेशनचे अध्यक्ष सुखदेव आव्हाड आदींसह पालकांनीही शाळेत एकत्र येत शोक व्यक्त केला. मंगळवारी सायंकाळी त्यांच्या मूळ गावी सांगवी (कळस, ता. अकोले) येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वाकचौरे यांच्या पश्चात पती, मुलगा असा परिवार आहे.