जिल्ह्याला मिळाला १ लाख ३ हजार लसींचा साठा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:15 IST2021-07-31T04:15:56+5:302021-07-31T04:15:56+5:30
नाशिक : जिल्ह्याला प्रदीर्घ कालावधीनंतर मोठा म्हणजेच १ लाख ३ हजार लसींचा साठा प्राप्त झाला आहे. त्यात जिल्ह्यासाठी ...

जिल्ह्याला मिळाला १ लाख ३ हजार लसींचा साठा !
नाशिक : जिल्ह्याला प्रदीर्घ कालावधीनंतर मोठा म्हणजेच १ लाख ३ हजार लसींचा साठा प्राप्त झाला आहे. त्यात जिल्ह्यासाठी कोविशिल्डचा ८० हजार लसींचा तर कोव्हॅक्सिनचा २३ हजार लसींचा साठा मिळाल्याने किमान आठवडाअखेरपर्यंत तरी नागरिकांना मुबलक प्रमाणात लस मिळण्याची चिन्हे आहेत.
जिल्ह्याला लसींचा पुरवठा पुरेशा प्रमाणात होत नसल्याने जुलै महिन्याच्या उत्तरार्धात लसीकरण पूर्णपणे विस्कळीत झाले होते. लसीकरणाच्या केंद्रांची संख्यादेखील शहर आणि ग्रामीणमध्ये रोडावली होती. तसेच प्रत्येक केंद्रावर दिल्या जाणाऱ्या लसींची संख्यादेखील खूप कमी झाल्याने रांगेत उभे राहूनही अनेक नागरिकांना लस न घेताच परतावे लागत होते. मात्र, निदान काही काळ तरी दिलासा देऊ शकेल, असा लससाठा उपलब्ध झाल्याने काही प्रमाणात तरी नागरिकांना लस मिळू शकणार आहे. शासकीय आदेशांचे कठोरपणे पालन केले जात असल्याने कोणाही राजकीय नेत्याच्या किंवा कार्यकर्त्यांच्या दबावापोटी कोणत्याही तालुक्यास कमी, जास्त लस दिली जात नसल्याचा दावा शासकीय यंत्रणेकडून करण्यात आला आहे.
इन्फो
लस वितरण होते लोकसंख्यानिहाय
जिल्ह्यातील १५ तालुके तसेच नाशिक आणि मालेगाव या दोन महानगरपालिकांना त्यांच्या लोकसंख्येनुसार लसींचे वितरण केले जाते. त्यामुळे ज्या महानगराची किंवा तालुक्याची लोकसंख्या अधिक तेथे अधिक लस तर ज्या तालुक्याची लोकसंख्या कमी त्यांना अन्य तालुक्यांच्या तुलनेत कमी लसपुरवठा केला जातो. त्यामुळे कमी लोकसंख्या असलेल्या आदिवासी तालुक्यांना सर्वात कमी लसपुरवठा होतो.
नाशिक मनपाला मिळाल्या २१ हजार लस
नाशिक महानगरपालिकेच्या केंद्रांसाठी १९ हजार कोविशिल्ड तर २४०० कोव्हॅक्सिन याप्रमाणे २१ हजार ४०० लस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या लसींचे वितरणदेखील शहरातील १३५ सेंटरना प्रत्येकी १३० याप्रमाणे करण्यात आले आहे. त्याशिवाय शासन निर्देशाप्रमाणे काही लसी सिक्युरिटी प्रेस तर काही वृद्धाश्रमात राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी वितरित करण्यात आल्या आहेत.