संकटमोचकाच्या पालकत्वावर विघ्न; शिवसेना-राष्ट्रवादीच्या आक्षेपांमुळेच आलेले पद गेले...
By संकेत शुक्ला | Updated: January 20, 2025 21:51 IST2025-01-20T21:50:34+5:302025-01-20T21:51:33+5:30
शिंदेसेनेला पालकमंत्रिपदाची अद्यापही अपेक्षा, शिंदेसेनेच्या दादा भुसे यांच्या नावाची असलेली चर्चा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्ह्यातील वर्चस्व.

संकटमोचकाच्या पालकत्वावर विघ्न; शिवसेना-राष्ट्रवादीच्या आक्षेपांमुळेच आलेले पद गेले...
नाशिक : ‘देवा’च्या मनात आले तर मला पालकमंत्रिपद मिळेल, असे वक्तव्य करणाऱ्या भाजपमधील संकटमोचक आ. गिरीश महाजन यांच्या पालकमंत्रिपदावर अवघ्या २४ तासांतच विघ्न आल्याने शिंदेसेना आणि भाजपमधील अंतर्गत कलह यासाठी कारणीभूत ठरल्याचे सोमवारी (दि. २०) स्पष्ट झाले. दिवसभर मुंबईत होणाऱ्या घडामोडींकडे जिल्ह्यातील राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहिले असताना गिरीश महाजन यांच्या अभिनंदनाचे फलक मात्र शहरात ठिकठिकाणी झळकत होते. त्यातच शिंदेसेनेच्या वक्तव्यामुळे संभ्रम अधिकच वाढला होता.
भुजबळांच्या नाराजीनाट्यापासून ते भाजपला एकही मंत्रिपद न मिळाल्याने लक्षवेधी ठरलेल्या नाशिकच्या पालकमंत्रिपदी शनिवारी गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली. तत्पूर्वी शिंदेसेनेच्या दादा भुसे यांच्या नावाची असलेली चर्चा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्ह्यातील वर्चस्व यामुळे दोन्ही पक्षांनी त्यावर हरकत घेतल्याने भाजपच्या वाटेला आलेले पालकमंत्रिपद स्थगित करण्यात आल्याची चर्चा जिल्ह्यात पसरली.
एकीकडे महाजन यांची राज्यातील राजकारणात असलेली संकटमोचकाची भूमिका आणि सिंहस्थाचा त्यांचा अनुभव लक्षात घेता त्यांना पालकमंत्रिपद दिले गेले होते, मात्र त्याला हरकत घेण्यात आली. त्यातून नियुक्तीला स्थगिती मिळाली. मात्र यासंदर्भात प्रतिक्रिया देण्यास पक्षाकडून निर्बंध घालण्यात आल्याने त्यावर कोणीही अधिकृत भाष्य केले नाही.