अपप्रवृत्तींमुळे कामात अडथळा
By Admin | Updated: December 6, 2015 22:15 IST2015-12-06T22:15:10+5:302015-12-06T22:15:45+5:30
सटाणा : माहितीचा अधिकार योग्य असला तरीही अधिकाऱ्यांसाठी डोकेदुखी

अपप्रवृत्तींमुळे कामात अडथळा
सटाणा : माहितीचा अधिकार हा नागरिकांसाठी योग्य असला तरी काही अपप्रवृत्तमुळे शासकीय अधिकाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. मात्र काही मंडळी काही क्लृप्त्या लढवून ही डोकेदुखी दूर करतात हे खरे; पण काही वेळा याच क्लृप्त्या अंगलटदेखील येत असतात. असाच काहीसा प्रकार सटाणा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी तथा माहिती अधिकारी बी. टी. पाटील यांच्याबाबत घडला. पाटील यांनी शिक्षकांच्या घरभाडे भत्त्याची माहिती देण्यासाठी टपाल खर्च चक्क सात हजार ऐंशी रुपये देऊन माहिती अधिकार कार्यकर्त्यावर अक्षरश: दबाव आणल्याचा प्रकार समोर आला आहे.
बागलाण तालुक्यातील तरसाळी येथील माहिती अधिकार कार्यकर्ता दर्शन रमेश रौंदळ यांनी सप्टेंबर महिन्यात माहितीचा अधिकार वापरून पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बी. टी. पाटील यांच्याकडे बागलाण तालुक्यातील जिल्हा परिषदअंतर्गत येणाऱ्या प्राथमिक शिक्षकांच्या घरभाडे भत्ता व मुख्यालयी राहणाऱ्या शिक्षकांसंदर्भात टपालाने माहिती मागवली होती. मात्र या गटशिक्षणाधिकारी यांनी मुदतीत अर्जाचे उत्तर तर दिलेच नाही; उलट अदा केलेला घरभाडे भत्ता तपशील, भाड्याने घेतलेल्या घराचा घरमालकाबरोबर केलेला करारनामा, उतारा, संमतीपत्र, कर्मचाऱ्यांचा हुद्दा, संख्या याची गावनिहाय यादी आदि कामासाठी अंदाजे १३ हजार ५३४ रुपये शुल्क व त्यासाठी लागणारा टपाल खर्च ७ हजार २८० रु पये असे एकूण २० हजार ८१४ रुपये शुल्क भरण्याबाबत रौंदळ यांना पत्र पाठविले आहे. गटशिक्षणाधिकारी यांनी दिलेल्या टपाल खर्चाबाबत सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात असून, शासनाच्या तिजोरी लुटीचा भंडाफोड होऊ नये म्हणून आर्थिक दबाव आणून हे प्रकरण दडपण्यासाठी केलेला प्रयत्न असल्याची तक्रार रौंदळ यांनी केली आहे. या प्रकाराबाबत माहिती अधिकार कार्यकर्ता रौंदळ यांनी संबंधित शिक्षकांची माहिती दडविण्यासाठी चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली म्हणून कोर्टामार्फत गटशिक्षणाधिकारी यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे माहिती देण्यापासून सुटका करून घेणाऱ्या या अधिकाऱ्याने शोधलेली पळवाट चांगलीच अंगलट येण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)